मिरज : मिरजेतील वखारभागात नागोबा कट्टा येथील ५० वर्षे जुनी झाडे तोडण्यास विरोध करणाऱ्या महिलेस महापालिका अधिकाऱ्यांनी फौजदारी कारवाईची नोटीस बजावली आहे. संघर्ष समिती व सेव्ह मिरज सिटीतर्फे झाडे वाचविण्यासाठी चिपको आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.कवलापुरे यांच्या घराशेजारील ५० ते ६० वर्षांची नारळाची ३ झाडे तोडण्याचा घाट काही राजकीय लोकांनी घातला आहे. ही झाडे तोडण्यास गेलेल्या महापालिका कर्मचाऱ्यांना सुलोचना भाऊसाहेब कवलापुरे यांनी विरोध केला. भोसे येथील राष्ट्रीय महामार्गावरील ४०० वर्षांपूर्वीचे वडाचे झाड वाचविण्यासाठी गल्लीपासून दिल्लीपर्यंत प्रयत्न झाले.
अखेर हे झाड वाचविण्यात यश आले. मात्र महापालिका क्षेत्रात अमृत योजना जलवाहिनीस व वाहतुकीस अडथळा होतो, असे सांगत वखारभागात जुन्या झाडांची कत्तल करण्यात येत आहे. वृक्ष संगोपन व पर्यावरण रक्षणाऐवजी निसर्गाचा समतोल बिघडवण्याचे काम सुरु असल्याची तक्रार आहे.महापालिका आयुक्तांनी याची दखल घेऊन, झाडे तोडण्यासाठी नागरिकांना धमकावणारे उद्यान पर्यवेक्षक शिवप्रसाद कोरे यांच्यावर कारवाई करावी, अन्यथा संघर्ष समिती व सेव्ह मिरज सिटीतर्फे चिपको आंदोलनाचा इशारा सेव्ह मिरज सिटी व जिल्हा संघर्ष समितीचे तानाजी रुईकर, अॅड. श्रीकृष्ण पोटकुळे, अॅड. विनय पाटील, अॅड. दीपक नांगरे, नागेश स्वामी, सुशील माळी, विनायक रुईकर, महेश स्वामी, उमेश स्वामी, गणेश स्वामी यांनी दिला आहे.