मिरज : महापालिका निवडणूक निकालापूर्वीच मिरजेतील प्रभाग चारमधील उमेदवारांना मिळालेल्या मतांची आकडेवारी फिक्स झाल्याच्या सोशल मीडियावरील अफवेमुळे मिरजेत दोन दिवस खळबळ उडाली. उमेदवार व चिन्हांच्या यादीत फेरफार करून निकाल फिक्स असल्याची अफवा पसरविणाºया अज्ञाताविरुध्द शनिवारी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महापालिका निवडणुकीत धक्कादायक निकालामुळे पराभूत उमेदवारांकडून इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र (इव्हीएम) घोटाळ्याची चर्चा सुरू आहे. त्यातच मिरजेत प्रभाग चारमधील भाजप उमेदवारांच्या मतदानाच्या आकडेवारीचे अगोदरच सेटिंग झाल्याच्या प्रचारामुळे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या मतदानाच्या आकडेवारीमुळे खळबळ उडाली. यामुळे प्रभाग चारसह अन्य प्रभागातील पराभूत उमेदवारांनीही न्यायालयात जाण्याचा पवित्रा घेतला होता. प्रभाग चारमधील उमेदवारांच्या अर्जांच्या छाननीनंतर त्यांना मिळालेल्या चिन्हांसह प्रसिध्द करण्यात आलेल्या उमेदवारांची अंतिम यादी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाच्या नोटीस बोर्डावरून काढून नेऊन अज्ञाताने निवडणूक निकाल लागल्यानंतर त्यावर चारही गटातील मतांची आकडेवारी खोडसाळपणे लिहून सोशल मीडियावर व्हायरल केली.
यादीमुळे पराभूत उमेदवार व त्यांचे समर्थक मतदानात घोटाळा झाल्याचा दावा करीत होते. निकाल १८ जुलै रोजीच तयार झाल्याचा आणि प्रभाग चारमध्ये मतदानाची व मतमोजणीची आकडेवारी जुळत नसल्याचा सोशल मीडियावरून प्रचार सुरू असल्याने याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. प्रभाग चारमधील विजयी झालेल्या भाजप उमेदवाराच्या निवडीविरुध्द मतमोजणी प्रक्रियेत त्रुटी असल्याचा आक्षेप घेऊन अपक्ष उमेदवार अनिलभाऊ कुलकर्णी व शुभांगी रूईकर यांनी न्यायालयात आव्हान देण्याची तयारी केली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सोशल मीडियावरील मतदानाची आकडेवारी बोगस असल्याचा खुलासा केला आहे. सोशल मीडियावर निवडणूक निकाल व इव्हीएम यंत्राबाबत अपप्रचार केल्याप्रकरणी अज्ञाताविरध्द गुन्हा दाखल केला आहे.उमेदवारांच्या यादीत निवडणूक निकालानंतर मतदानाचे आकडेमहापालिका निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकाºयांनी दि. १८ जुलै रोजी प्रसिद्ध केलेल्या उमेदवारांच्या यादीत निवडणूक निकालानंतर मतदानाचे आकडे लिहून मतदानापूर्वीच उमेदवारांचे मतदानाचे आकडे फिक्स असल्याची सोशल मीडियावर प्रसिद्धी झाल्याची तक्रार अशरफ वानकर व तानाजी रूईकर यांनी केल्याने तक्रारदार व नागरिकांसोबत आयुक्तांच्या कक्षात बैठक झाली. निवडणूक निर्णय अधिकारी स्मिता कुलकर्णी, उपायुक्त सुनील पवार यांनी दि. १८ जुलैच्या निवडणूक कामकाजाची मूळ कागदपत्रे सर्वांना दाखविली. आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी बेकायदेशीर कृती करून निवडणूक प्रकियेबाबत संभ्रम निर्माण करणे व निवडणूक प्रकियेबाबत अपप्रचार केल्याबद्दल सबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. सहायक आयुक्त श्रीकांत पाटील यांनी सांगली शहर पोलिसात निवडणूक प्रक्रियेबाबत सोशल मीडियावर अपप्रचार केल्याबद्दल अज्ञाताविरुध्द फिर्याद दिली आहे.