येडेनिपाणी (ता. वाळवा) येथे वसंतदादा पाटील स्मृती व्याख्यानमालेतील ‘अरे संसार संसार...’ या विषयावर इस्लामपूर पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्याशी छाया महादेव पिंगळे व भाग्यश्री फरांदे यांनी संवाद साधला. यावेळी वाळवा पंचायत समितीच्या सभापती शुभांगी पाटील उपस्थित होत्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
कामेरी : परिस्थिती प्रतिकूल असो की अनुकूल मनामध्ये जर सकारात्मक विचार असतील व आपल्या ध्येयाचा पाठलाग करण्याची क्षमता जर आपण निर्माण केली तर कोणतेही यश आपण मिळवू शकतो, असे मत छाया महादेव पिंगळे व भाग्यश्री फरांदे यांनी मुक्त संवाद साधताना व्यक्त केले.
येडेनिपाणी (ता. वाळवा) येथील पद्मभुषण वसंतदादा पाटील स्मृती व्याख्यानमालेतील ‘अरे संसार संसार...’ या विषयावर इस्लामपूर पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्याशी संवाद साधताना त्या बोलत होत्या. वाळवा पंचायत समितीच्या सभापती शुभांगी पाटील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या.
भाग्यश्री फरांदे या कृषी उपसंचालक म्हणून कोल्हापूर येथे कार्यरत आहेत. या मुक्त संवादामध्ये प्रश्नोत्तर स्वरूपामध्ये पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी आपली आई छाया पिंगळे व भाग्यश्री फरांदे यांच्या जीवनातील सर्व जडणघडणीची माहिती श्रोत्यांसमोर मांडली.
छाया पिंगळे या अत्यंत गरीब घराण्यातील होत्या. घरची परिस्थिती अतिशय गरीब होती. कृष्णाच्या शिक्षणासाठी फार प्रतिकूल परिस्थिती होती. कृष्णाचे डी. एड्. सुरू असताना दारूच्या व्यसनात वडिलांचे निधन झाले. डी. एड्. झाल्यानंतर त्याला प्राथमिक शिक्षकाची नोकरी मिळाली. मात्र, मामाची इच्छा होती की, कृष्णाने फौजदार व्हावे म्हणून त्याने स्पर्धा परीक्षा दिल्या. यामधूनच कृष्णात डीवायएसपी झाला.
भाग्यश्री फरांदे यांनी आपल्या आईचा आपल्या जडणघडणीमध्ये मोठा वाटा असल्याचे सांगितले. लहानपणी आईने करून घेतलेल्या अभ्यासामुळे मी मोठेपणी उभी राहिल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांचे पती डॉ. सुभाष फरांदे यांना कॅन्सर झाला होता. परंतु, औषधासह सकारात्मक विचार, आनंदी वृत्ती, प्राणायाम, योगासने या माध्यमातून त्यांनी कॅन्सरवर मात केल्याचे सांगितले.