जत : यंदाच्या वर्षी पहिल्या टप्प्यात चांगला पाऊस झाल्यानंतर जत पूर्व भागातील शेतकऱ्यांनी अल्प ओलीवर पेरण्या करून घेतल्या आहेत. झालेल्या पेरणीनंतर अधून-मधून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत असल्याने या पावसावरच पिकांची उगवण झाली; परंतु गेल्या दहा दिवसांपासून दिवसभर पावसाचे वातावरण तयार होते; परंतु सुसाट वाऱ्याने ढग गायब होतात. पाऊस पडतच नाही. असेच वातावरण राहिल्यास शेतकऱ्यांसमाेर दुबार पेरणीचे संकट उभे राहणार आहे.
जमिनीतील ओल पावसाअभावी संपल्याने जत परिसरातील पिके सुकू लागली आहेत. जत परिसरात पावसाळा सुरू झाल्यापासून एकही दमदार पाऊस झालेला नाही. ओढे, नाल्याला पाणी आलेले नाही. त्यामुळे अजूनही विहिरी कोरड्याच आहेत. पाणीच नसल्याने सिंचनाची सोय असूनही शेतकरी हतबल आहेत.
जून महिन्यात केवळ एकच दमदार पाऊस झाला. या पडलेल्या पावसाच्या ओलीवर शेतकऱ्यांनी कापूस, उडीद, तूर, बाजरी, सोयाबीन, मूग, ज्वारी पेरणी केली. पेरणी झाल्यानंतर अधूनमधून पावसाच्या बारीक सरी दाखल होत आहेत; परंतु गेल्या आठ दिवसांपासून पावसाचे वातावरण तयार होते; परंतु सुसाट वाऱ्याने पाऊस गायब होताे. या सुसाट वाऱ्यामुळे जमिनीतील ओलही कमी हाेत आहे. कडक ऊन पडत असल्याने कोवळी पिके कोजमली जात आहेत.
ज्या भागात पाऊस नव्हता, त्या भागात पेरणीयोग्य पाऊस झाल्याने या भागातील शेतकऱ्यांची पेरणी सुरू आहे; परंतु पेरणीनंतर गेल्या आठ दिवसांपासून अधूनमधून येणारा हलकसा पाऊसही सुसाट वाऱ्याने गायब होत आहे. येणाऱ्या दोन-तीन दिवसांत पाऊस नाही झाला तर जत परिसरातील शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट येण्याची भीती व्यक्त हाेत आहे.