सांगली : यंदा जिल्ह्यात पावसाने ओढ दिली असून, त्याचा परिणाम खरीप हंगामातील पेरणीवर झाला आहे. जिल्ह्यात खरिपाचे दोन लाख ५५ हजार ९८४ हेक्टर क्षेत्र असून, त्यापैकी केवळ ३७ हजार ८०१ हेक्टरवर पेरणी झाली आहे. त्यामध्ये सर्वाधिक पेरा भाताचा तर सर्वांत कमी कडधान्ये, बाजरी, ज्वारी पिकाची पेरणी झाली आहे. पावसाने उघडीप दिल्याने पिकांची उगवण खुंटली असल्याने दुबार पेरणीचे संकट ओढावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खरीप हंगामाचे क्षेत्र घटण्याचा अंदाज कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.जिल्ह्यात खरीप हंगामातील पिकांच्या पेरणी मध्यावर आल्या आहेत. मात्र, जून महिन्यापासून पुरेसा पाऊस झाला नसल्याने पेरणीला गतीच मिळाली नाही. पुरेशी ओलच झाली नसल्याने शेतकऱ्यांनी पेरणीसाठी पाठ फिरवली असल्याचे चित्र आहे. खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र दोन लाख ५५ हजार ९८४ हेक्टर असून, ३७ हजार ८०१ हेक्टरवर म्हणजे १४ टक्के इतकाच पेरा पूर्ण झाला आहे. कडधान्य, ज्वारी, बाजरी ही पिके दुष्काळी पट्ट्यातील आटपाडी, जत, कवठेमहांकाळ या तालुक्यांत प्रामुख्याने घेतली जातात; परंतु या तालुक्यात या पिकांच्या पेरणीसाठी पाऊसच झाला नसल्याने या पिकांची पेरणी अत्यल्प झाली आहे.शिराळा तालुक्यात ११ हजार १७० हेक्टरवर धूळवाफेवर भाताची पेरणी झाली असून, उगवण चांगली आहे; परंतु रोप लागणीची कामे खोळंबली आहे. जिल्ह्यात मक्याचे सरासरी क्षेत्र ४० हजार ७५३ हेक्टर इतके आहे. चार हजार ९५ हेक्टरवर लागवड झाली आहे. पेरणीनंतर पाऊस नसल्यामुळे पिके कोमेजू लागली आहेत. पीक जगविण्यासाठी सध्या शेतकऱ्यांची धडपड चालू आहे. अनेक ठिकाणी पिकांची वाढ खुंटल्यामुळे तेथे दुबार पेरणी करावी लागेल, असे चित्र दिसत आहे.
मक्यावर लष्करी अळीचा फैलावसध्या वातावरणातील बदलामुळे मक्यावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे, असे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. लष्करी आळीचा फैलाव असणाऱ्या ठिकाणी शेतकऱ्यांना औषध फवारणीच्या सूचना दिल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
जिल्ह्यात पेरणी झालेले क्षेत्र (हेक्टरमध्ये)तालुका - क्षेत्रशिराळा १९,१३३जत २,६१९वाळवा ४,६७९तासगाव ३,३५९क.महांकाळ २,५६५मिरज १,२२१खानापूर ३३८आटपाडी १,४४५पलूस १,०४६कडेगाव १,३९५एकूण ३७,८०१