फोटो ओळ : दुधोंडी (ता. पलूस) येथे संजय साळुंखे यांच्या कलिंगडाच्या झालेल्या नुकसानीची सुधीर जाधव, डॉ. नागराज रानमाळे, सुनील नलवडे यांनी पाहणी केली.
दुधोंडी : गत चार दिवसांपूर्वी झालेल्या वादळी पावसाने पलूस तालुक्यातील दुधोंडी परिसरात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. यांची पाहणी मानसिंग को-ऑप बँकेचे अध्यक्ष सुधीर जाधव यांनी केली.
परिसरातील ऊस, कलिंगड, ढबू मिरची, द्राक्ष बागा, टोमॅटो, मिरची, केळी, मका, पपईसह पालेभाज्या व पिकांचे नुकसान झालेले आहे. तसेच गावातील घरे, जनावरांचे शेड, झोपड्या, घरांवरील सौर ऊर्जा पॅड तसेच वीजयंत्रणेचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. सुधीर जाधव यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडून लवकरात लवकर शासनाकडून मदत मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी सुधीर जाधव यांनी जे. के. बापू जाधव यांच्या मार्गदर्शाखाली शासन स्तरावर पाठपुरावा करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळण्यासाठी प्रयत्न करू, असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी पलूस तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील नलवडे, दुधोंडी तंटामुक्ती अध्यक्ष डॉ. नागराज रानमाळे, कृष्णाकाठ शेतीमाल प्रक्रिया संस्थेचे मॅनेजर दिगंबर जाधव, विवेक नलवडे, संजय साळुंखे, सुनील साळुंखे आदी उपस्थित होते.