लोकमत न्यूज नेटवर्क
जत : जत तालुक्यात रब्बी हंगामातील पिकांची काढणी व मळणी सुरू झाली आहे. डिझेलचे दर वाढल्यामुळे मळणी यंत्र चालकांनी पिकांची रास करून देण्याचे दर वाढविले आहेत. याचा शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे.
जत परिसरात द्राक्ष व डाळिंब या फळपिकांची काढणी व रब्बी हंगामातील पिकांची सुगी एकाच वेळी सुरू झाल्यामुळे मजुरांची टंचाई जाणवू लागली आहे. तालुक्यात रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी, करडई, सूर्यफूल या पिकांची मळणी होत आहे. मळणी करण्यासाठी एक लहान कट्टा ७० रुपये व मोठ्या पोत्याला १४० रुपये मळणी मशीन मालक भाडे घेत आहेत.
मजुरांना ने-आण करण्यासाठी शेतजमीन मालकाला स्वतंत्र व्यवस्था करावी लागत आहे. त्यामुळे स्वतंत्र गाडीचे भाडे देऊन जमीन मालक मजुरांची व्यवस्था करीत आहेत.
चौकट
दुहेरी संकट
मजुरीचे दर वाढले व मळणी मशीनचे भाडे जादा झाले; परंतु ज्वारी आणि वैरण (कडबा) याच्या दरात अद्याप वाढ झाली नाही. त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.