अविनाश कोळीसांगली : वंचित बहुजन आघाडीनेसांगलीत नुकतीच सत्ता संपादन निर्धार सभा घेत लोकसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले. या सभेने खेचलेल्या गर्दीमुळे महाविकास आघाडीत विशेषत: काँग्रेसमध्ये बेचैनी वाढली आहे. मागील लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने पदरात पाडलेली मते निर्णायक ठरली होती. सांगलीत पुन्हा वंचितला मिळणारा प्रतिसाद कॉंग्रेसची चिंता वाढविणारा आहे.
सांगली लोकसभा मतदार संघावर दीर्घकाळ काँग्रेसचे वर्चस्व राहिले. २०१४ पासून हा भाजपचा बालेकिल्ला बनला आहे. दोनपैकी एका निवडणुकीत काँग्रेसने हा बालेकिल्ला ताब्यात घेण्याचा आटोकाट प्रयत्न केला, मात्र यश आले नाही. मागील निवडणुकीत काँग्रेसचे विद्यमान प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील हे स्वाभिमानी शेतकरी पक्षाकडून लढले होते.मागील निवडणुकीत विशाल पाटील यांच्यासमोर केवळ भाजपचे खासदार संजय पाटील यांचेच आव्हान नव्हते, तर वंचित बहुजन आघाडीने आमदार गोपीचंद पडळकर यांच्या माध्यमातून तगडा उमेदवार उभा केला होता. निवडणुकीत झालेल्या पराभवाची कारणमिमांसा करताना काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारीकडे बोट केले होते.आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पुन्हा विशाल पाटील प्रयत्नशील आहेत. काँग्रेसकडून यासाठी तयारी सुरू असतानाच पुन्हा वंचित बहुजन आघाडीने सांगली लोकसभा मतदारसंघात रणशिंग फुंकले. अर्थात ते इंडिया आघाडीत येण्यासाठी इच्छुक आहेत. तसा प्रस्तावही दिला आहे, मात्र इंडिया आघाडीत त्यांचा समावेश अद्याप झालेला नाही. त्यामुळे वंचितची डोकेदुखी काँग्रेससमोर कायम आहे.
प्रकाश आंबेडकरांचा इशारावंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या सांगलीतील सभेला गर्दी झाली. सभेत वंचितच्या पदाधिका-यांनी ‘इंडिया’मध्ये सहभाग न झाल्यास स्वतंत्र लढण्याचा इशारा दिला. या इशाऱ्याने काँग्रेसची चिंता वाढू शकते.
पक्षनिहाय मतांची टक्केवारी
- भाजप ४२.७७
- स्वाभिमानी शे. सं. २८.९६
- वंचित बहुजन आघाडी २५.२३
- इतर ३.०४
इतिहास काय सांगतो
- १९६७ ते २०१९
- काँग्रेसचा स्ट्राइक रेट ७५ टक्के
- भाजपचा स्ट्राइक रेट २५ टक्के
- काँग्रेस विजयी - १२ वेळा
- भाजप विजयी - २ वेळा
भाजपचे मताधिक्य घटले२०१४ च्या निवडणुकीत भाजपचे खासदार संजय पाटील यांना काँग्रेसचे उमेदवार प्रतीक पाटील यांच्याविरोधात २३ टक्क्यांचे मताधिक्य होते. २०१९ मध्ये हे मताधिक्य १४ टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. त्यामुळे काँग्रेसला आगामी निवडणुकीत विजयाची आशा वाटते. परंतु, वंचितच्या भूमिकेचाही त्यांना फटका बसू शकतो.