सांगली : अवघ्या चार दिवसांवर आलेल्या मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान ईदमुळे शहरातील बाजारपेठ खरेदीसाठी गर्दीने अक्षरश: फुलून गेली होती. पावसाच्या रिमझिम धारांची पर्वा न करता मुस्लिम बांधवांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. कपडे, सुका मेवा खरेदीला प्राधान्य देण्यात येत होते. शहरासह ग्रामीण भागातील मुस्लिम बांधवांनीही सांगलीच्या बाजारपेठेत गर्दी केली होती. मुस्लिम बांधवांचा पवित्र सण रमजान ६ जुलैला असून, त्यासाठीची तयारी सुरू झाली आहे. दुष्काळाचा सणावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत होती, मात्र असा परिणाम दिसून येत नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. कपड्यांची खरेदी सुरू असल्याने शहरातील भारती विद्यापीठ चौक, स्टेशन रस्ता, कापड पेठ, बालाजी चौक, हरभट रोड आदी भागातील कापड दुकानदारांनीही खास आॅफर सुरू केली आहे. विशेषत: साड्यांमध्ये विशेष सूट देण्यात येत असून, सध्या लोकप्रिय असलेल्या मालिकांमधील साड्यांना जादा मागणी आहे. रेडिमेड कपड्यांमध्ये बाजीराव मस्तानी ड्रेसला जास्त मागणी असून, ड्रेस मटेरियलमध्ये सध्या लोकप्रिय चित्रपट असलेल्या सैराट मटेरियलला जास्त मागणी असल्याचे ‘मैत्रीण’चे अजय गंगवाणी यांनी सांगितले. याबरोबरच लॉँग कुर्तीज, लाशा, शरारा, अनारकली ड्रेस, कॉटन प्रिंट मटेरियलला मागणी वाढली असून, सध्या ईदबरोबरच मान्सून सेल सुरू असल्याने ग्राहकांची गर्दी होत असल्याचेही त्यांनी सांगितले. सुक्या मेव्याच्या खरेदीसाठी मुस्लिम बांधवांनी गर्दी केल्याचे दिसून आले. काजू, बदाम, पिस्ता, चारोळी, खोबरे, आक्रोड, केशर, वेलदोडे, शेव, मगज बी, खारीक आदींना चांगली मागणी असल्याचे पंचमुखी मारुती रोडवरील ‘मसाला कॉर्नर’चे कृष्णा राठोड यांनी सांगितले. यंदा काजूच्या दरात मोठी वाढ झाली असून, सध्या काजूचा किलोचा दर आठशे रुपयांपर्यंत असल्याचे त्यांनी सांगितले. बदामाचे दर मात्र काही प्रमाणात उतरले असून, इतर ड्रायफ्रूटच्या दरात वाढच झाल्याचे राठोड यांनी सांगितले. बाजारपेठेत आणखी तीन दिवस खरेदीसाठी अशीच गर्दी होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी) दिवसभर वाहतूक ठप्प ईदच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी झाल्याने शहरातील राजवाडा चौक, महापालिका चौक, हरभट रोड, बालाजी चौक, टिळक चौक परिसरातील वाहतूक शनिवारी दुपारपासूनच ठप्प झाली होती. सायंकाळी तर राजवाडा चौकापासून स्टेशन चौकापर्यंत, पटेल चौकापर्यंत व महापालिकेसमोर वाहतूक ठप्प झाली होती. सायंकाळी साडेसहा वाजता आयर्विन पुलाकडून आलेली एक रुग्णवाहिका गर्दीत अडकली. भोंगा वाजवूनही गर्दी हटत नव्हती. शेवटी वाहतूक पोलिसांनीच नियोजन करून रुग्णवाहिकेला वाट करून दिली. वाहतूक पोलिसांची कसरत सांगलीच्या राजवाडा चौक, महापालिका, हरभट रोड याठिकाणच्या चौकांमध्ये वाहतूक पोलिसांनी वाहतुकीचे नियोजन करण्याचा प्रयत्न केला, मात्र आवाक्याबाहेर गर्दी गेल्याने त्यांची कसरत सुरू होती. एसटीबससह मोठ्या वाहनांची ये-जा नेहमीच्याच मार्गाने होत असल्यामुळे नियोजनात अडचणी येत होत्या. टिळक चौकापासून राजवाडा चौकापर्यंत विस्कळीत होणारी वाहतूक पूर्ववत करताना पोलिसांची दमछाक झाली. दिवसभर वाहतुकीची कोंडी सुरूच होती. वाहतूक पोलिसांना त्यामुळे या ठिकाणीच थांबावे लागले. रात्री उशिरापर्यंत वाहतूक पोलीस या चार चौकांमध्ये ठाण मांडून होते.
सांगलीत ईदच्या खरेदीसाठी उसळली गर्दी
By admin | Published: July 03, 2016 12:14 AM