सांगली : महापालिका व पालकमंत्र्यांनी वेगवेगळ्या लॉकडाऊनच्या घोषणा करून संभ्रम वाढविला. कडक अंमलबजावणी करायची नव्हती तर मग चुकीच्या निर्णयातून गर्दीला निमंत्रण का दिले, असा सवाल व्यापारी एकता असोसिएशनचे अध्यक्ष समीर शहा यांनी उपस्थित केला.
यासंदर्भात त्यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, ३ मे रोजी महापौरांनी असोसिएशनला बैठकीसाठी आमंत्रित केले होते. त्या बैठकीत अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू असणाऱ्या असोसिएशनचे नेतेही हजर होते. महापौरांनी कडक लॉकडाऊनसाठी विनंती केली. त्याला असोसिएशनने सकारात्मकता दर्शविली. तेव्हा ५ ते ११ मे या आठ दिवसांच्या लॉकडाऊनचा निर्णय झाला होता.
त्यानंतर लगेचच जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी सांगली जिल्ह्यात ६ मे पासून कडक लॉकडाऊनची घोषणा केली. दोन्हीही घोषणेत फक्त एक दिवस आणि ४ तासांचा अत्यावश्यक व्यवसायाचा फरक आहे. आम्ही प्रशासनास ही बाब विचारली आणि नेमक्या तारखेबाबत विचारणा केली. या गोंधळामुळे गर्दी झाली.
त्यामुळे यापुढे अशा नियोजनशून्य उपक्रमात संघटना इथून पुढे सहभागी होणार नाही. गेले वर्षभर अखंड लॉकडाऊनमध्ये सुरूच असलेल्या दुकानांनी फक्त सकाळचे चार तासही दुकाने बंद ठेवली नाहीत. सोमवारी शहरात झालेली गर्दी ही कपडे, भांडी, सोने खरेदी करण्यासाठी नव्हती, तर ती अत्यावश्यक सेवेतील दुकानांमध्येच होती. याचे आत्मचिंतन व्हावे. कुठतरी एकवाक्यता ठेवण्यात प्रशासनाची चूक होत आहे. इथून पुढे आरोग्य आणि व्यवसाय दोन्हीची सांगड घालूच, पण इतर व्यापारी बांधवांवर होणारा अनावश्यक अन्याय सहन केला जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.