प्रताप महाडिककडेगाव : ‘श्रावणमासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरूनी ऊन पडे’, या उक्तीचा प्रत्यय देणारे नयनरम्य चित्र सध्या तीर्थक्षेत्र सागरेश्वर मंदिर व यशवंतराव चव्हाण वन्यजीव अभयारण्य पाहावयास मिळत आहे. दोन दिवसात श्रावण महिना सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर येथील परिसर हिरवाईने नटला आहे. सृष्टीचे हे लावण्य पाहणाऱ्या प्रत्येकाला हा परिसर भुरळ घालत आहे.कोरोनाच्या संकटकाळात मागील दोन वर्षांपासून पर्यटक या निसर्गाच्या नजराण्यापासून मात्र वंचित राहिले होते. यावर्षी मात्र, पर्यटक सागरेश्वर अभयारण्य परिसराला भेट देऊन येथील निसर्गसौंदर्याचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी व येथील निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी येत आहेत.सागरेश्वर मंदिर परिसरात सातवाहन काळातील इतर देवदेवतांच्या ५१ मंदिरांचा समूह आहे. सागरेश्वर अभयारण्याच्या डोंगरमाथ्यावरील किर्लोस्कर पॉइंट, महान गुंड, लिंगदरा व तेथील हिरवागर्द निसर्ग पर्यटकांना आकर्षित करत आहे. सागरेश्वराच्या अभयारण्यात सांबर, काळवीट, भेर, तरस, लांडगे, कोल्हे, ससे, रानमांजरं आदी प्राणीही येथे दिसतात.
याशिवाय डोंगरावरून एका बाजूला दिसणारा कृष्णा काठ व दुसऱ्या बाजूला दिसणारे सोनहिरा खोरे सर्वांनाच खुणावत आहे. मागील महिनाभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे येथील निसर्गसौंदर्य चांगलेच बहरले आहे. ओढे, नदी-नाले वाहू लागले आहेत. छोटे धबधबे कोसळू लागले आहेत.श्रावण महिन्यातील दर सोमवारी सागरेश्वर दर्शनासाठी भाविक, पर्यटकांची गर्दी होत असते. सागरेश्वर अभयारण्य परिसरात बहरलेली, वाऱ्याच्या झोतावर डोलणारी वनसंपदा लक्ष वेधून घेत आहे.
पर्यटकांसाठी निसर्ग सफारी बस
पर्यटकांसाठी आता निसर्ग सफारी बसची सोय झाली आहे. याशिवाय बाहेरून मुक्कामी येणाऱ्या पर्यटकांसाठी बांबू कुटीमध्ये निवास व्यवस्था करण्यात आली आहे. या सुविधांसाठी शुल्क आकारले जाते.