सांगली : निसर्गापासून दुरावत चाललेल्या नव्या पिढीला निसर्गाशी एकरूप करणाऱ्या आणि विविध प्रकारच्या मनमोहक फुलांच्या दुनियेत घेऊन जाणाºया गुलाब पुष्प प्रदर्शनास रविवारी सांगलीकरांनी मोठी गर्दी केली होती. सायंकाळनंतर रात्री उशिरापर्यंत प्रदर्शन पाहण्यासाठी गर्दी होती. पाच हजारहून अधिक फुले आणि फुलांपासून बनविण्यात आलेल्या विविध रचना पाहण्यासाठी गर्दी होती. प्रदर्शनानिमित्त विविध प्रकारच्या फूलझाडांच्या विक्रीलाही चांगला प्रतिसाद मिळाला.दि सांगली रोझ सोसायटी व मराठा समाजच्यावतीने आयोजित गुलाब पुष्प प्रदर्शन व पुष्परचना स्पर्धेचा सांगता समारंभ रविवारी सायंकाळी पार पडला. यावेळी सातारा वन विभागाचे उप वनसंरक्षक डॉ. भारतसिंह हाडा व सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या उपसंचालिका डॉ. विनीता व्यास यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्याहस्ते स्पर्धेतील विजेत्यांना गौरविण्यात आले.मराठा समाज सांस्कृतिक भवनमध्ये शनिवारपासून प्रदर्शनास सुरुवात झाली होती. रविवार सुटीचा दिवस असल्याने प्रदर्शन पाहण्यास सांगलीकरांनी मोठी गर्दी केली होती. विविध प्रकारातील गुलाब, देशी व विदेशी फुले आणि झाडांपासून तयार करण्यात आलेल्या रचना आकर्षित करत होत्या. तब्बल सोळा तास मेहनत करून कोलकाता येथील चार कलाकारांनी आर्किडच्या फुलांपासून तयार केलेल्या नऊ फुटी दोन मोरांच्या रचनेला विशेष दाद दिली जात होती. बक्षीस वितरण समारंभावेळी उप वनसंरक्षक डॉ. भारतसिंह हाडा व सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या उपसंचालक डॉ. विनीता व्यास यांनी उपक्रमास शुभेच्छा दिल्या.यावेळी नानासाहेब चितळे, मराठा समाजचे अध्यक्ष अॅड. उत्तमराव निकम, शहाजीराव जगदाळे, प्रकाश चव्हाण, प्रकाश मव्दाण्णा, ज्योती चव्हाण, नंदा झाडबुके, पद्मजा चौगुले, अश्विनी पाचोरे, पापा पाटील, प्रज्ञा सावंत यांच्यासह रोझ सोसायटी व मराठा समाजचे पदाधिकारी उपस्थित होते.
सांगलीत पुष्प प्रदर्शन पाहण्यास गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2018 11:10 PM