आजपासून जनता कर्फ्यूदरम्यान किराणा दुकाने, भाजीपाला विक्री बंद राहणार असल्याने मिरजेत मंगळवारी सकाळी बाजारपेठेत खरेदीसाठी झुंबड उडाली होती. बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी करणारे कोरोना विसरले होते. महापालिका व पोलिसांकडून रोखण्यात येत असतानाही कोणी जुमानत नसल्याने सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाला होता. अत्यावश्यक सेवा वगळता उघडलेली अन्य दुकाने पोलिसांनी बंद केली. दुकानात गर्दी जमवून नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. यावेळी काही दुकानदार व पोलिसांत वादावादीचे प्रकार घडले. मार्केट परिसरात भाजीबाजार सुरू होता. पोलिसांनी कठोर पवित्रा घेत रस्त्यावरील विक्रेत्यांना पिटाळून लावले. भाजी बाजार व किराणा दुकानांत खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती. प्रशासनाला न जुमानता रस्त्यावर मोठी गर्दी झाल्याने सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाला. मार्केट सोमवार पेठ, शनिवार पेठ, किसान चाैकासह बाजारपेठेत गर्दी होती. भाजीविक्रेत्यांच्या हातगाड्या पुन्हा रस्त्यावर आल्या होत्या. रस्त्यांवर व बाजारात गर्दी करणारे कोरोना संसर्गाचा धोका विसरल्याचे चित्र होेते.
मिरजेत बाजारात खरेदीसाठी गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2021 4:44 AM