लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारपासून नव्या नियमांच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली. त्यासाठी सकाळी ११ पूर्वी खरेदीसाठी नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडले होते. दुपारनंतर सर्वच आस्थापना बंद झाल्याने रस्त्यावर शुकशुकाट होता. पोलिसांनी दुपारी ध्वनिक्षेपकावरून आवाहन करीत नागरिकांना घरी पाठविले. त्यामुळे रस्त्यावरील वर्दळ बऱ्याच अंशी कमी झाली.
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. दररोज हजारहून अधिक रुग्ण सापडत आहेत. त्यात शासनाने कोरोना प्रतिबंधासाठी नवी नियमावली लागू केली आहे. अत्यावश्यक सेवेतील सर्व दुकाने सकाळी ७ ते ११ पर्यंतच सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. भाजीपाला, किराणा माल खरेदीसाठी अशा दुकानांत गर्दी होत होती. ही गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे सकाळी ७ वाजल्यापासूनच नागरिक खरेदीसाठी बाहेर पडले होते.
महापालिकेने शहरात विविध ठिकाणी खुल्या भूखंडावर भाजीपाला विक्रीची व्यवस्था केली आहे. त्या ठिकाणी सकाळपासूनच खरेदीसाठी गर्दी होती. तशीच स्थिती किराणा दुकानांतही दिसत होती. ११ नंतर मात्र ही सर्वच आस्थापने बंद करण्यात आली. त्यात पोलिसांनीही ११ नंतर शहरात गस्त सुरू केली. पोलीस वाहनातील ध्वनिक्षेपकावरून दुकाने बंद करून नागरिकांना घरी जाण्याचे आवाहन करण्यात येत होते. रस्त्याकडेच्या फळ, भाजी विक्रेत्यांनाही पोलिसांनी सूचना दिल्या. त्यामुळे दुपारी १२ नंतर शहरात शुकशुकाट जाणवत होता. रस्ते ओस पडले होते.
चौकट
पोलिसांकडून तपासणी
शहरात पोलिसांनी संचारबंदीच्या नियमांची कडक अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली. स्टेशन चौक, काॅलेज कॉर्नरसह विविध ठिकाणी बॅरिकेट्स लावून वाहनांची तपासणी करण्यात आली. दुपारनंतर विनाकारण फिरणाऱ्या वाहनधारकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. पोलिसांकडून खात्री करून वाहने पुढे सोडली जात होती.