फोटो :
रेठरेबुद्रुक (ता. कऱ्हाड) येथील कृष्णा कारखान्याच्या ऑनलाईन वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांनी मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. अतुल भोसले, जगदीश जगताप उपस्थित होते.
---
शिरटे : कृष्णा कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांच्या उसाचे गाळप वेळेत आणि अधिक चांगल्या क्षमतेने व्हावे यासाठी कारखान्याचे आधुनिकीकरण करून, कारखान्याची प्रतिदिन गाळप क्षमता १२ हजार टन करण्याचा निर्णय कृष्णा कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत एकमताने घेण्यात आला. सभासदांच्या मागणीनुसार एफआरपीची उर्वरित रक्कम दिवाळीपूर्वी अदा करण्याची ग्वाही यावेळी डॉ. सुरेश भोसले यांनी दिली.
रेठरेबुद्रुक (ता. कऱ्हाड) येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची ६५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली. शेतकऱ्यांच्या उसाचे वेळेत गाळप होण्याच्यादृष्टीने कारखान्याचे आधुनिकीकरण करीत प्रतिदिन गाळप क्षमता १२ हजार टन केली जाणार आहे. कारखान्याच्या को-जनरेशन प्रकल्पाची क्षमता १६ मे. वॅटवरून ४८ मे.वॅटपर्यंत वाढविण्याचा आणि डिस्टिलरी प्रकल्पाची क्षमता ९५ केएलपीडीवरून ३०० केएलपीडीपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे प्रतिपादन अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांनी केले.
कृष्णा सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, कारखान्याचे उपाध्यक्ष जगदीश जगताप, संचालक लिंबाजीराव पाटील, दयानंद पाटील, जितेंद्र पाटील, धोंडिराम जाधव, संजय पाटील, बाबासाहेब शिंदे, संभाजीराव पाटील, शिवाजी पाटील, जयवंत मोरे, जयश्री पाटील, इंदुमती जाखले, वसंतराव शिंदे, अविनाश खरात, दीपक पाटील, कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी उपस्थित होते.
जगदीश जगताप यांनी स्वागत केले. कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी यांनी नोटिसीचे वाचन केले. सचिव मुकेश पवार यांनी मागील सभेचा इतिवृत्तांत वाचून दाखविला. संचालक जितेंद्र पाटील यांनी आभार मानले.