सांगली : येथील वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात २३ कोटी रुपये खर्चून सीटी स्कॅन व एमआरआय यंत्रणा लवकरच सुरु होणार आहे. त्यासाठी २३ कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता मिळाली आहे. खरेदीची प्रक्रिया लवकरच सुरु होणार असून वर्षभरात यंत्रणा कार्यान्वित होतील.या दोन्ही सुविधांसाठी राजकीय स्तरावर मागण्या होत असल्या तरी प्रशासकीय स्तरावर त्याला यापूर्वीच मान्यता मिळाली आहे. सीटी स्कॅनिंगसाठी जिल्हा नियोजन मंडळाने आठ कोटी रुपये मंजूर केले आहेत. यामध्ये स्कॅनिंग उपकरणासह संपूर्ण सेट उपलब्ध होणार आहे. त्याच्या खरेदीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. एमआरआयसाठी १५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. यामध्ये एमआरआय यंत्र, स्वतंत्र इमारत, यंत्रणा चालवण्यासाठी तंत्रज्ञ आदींचा समावेश आहे. या खर्चाला आरोग्य विभागाने मान्यता दिली आहे. आता खरेदीची प्रक्रिया सुरु केली जाणार आहे. दोहोंच्या उपलब्धतेसाठी आमदार सुधीर गाडगीळ यांनी शासनाकडे यापूर्वीच पत्रे दिली आहेत.आरोग्य विभागाची बहुतांश मोठी खरेदी हाफकीन संस्थेच्या माध्यमातून होते. शासन संबंधित रुग्णालयाला पैसे देते, त्यानंतर रुग्णालयाकडून हाफकीनकडे पैसे वर्ग केले जातात. हाफकीन खरेदी करुन रुग्णालयाकडे पाठवते अशी प्रक्रिया आहे. मात्र हाफकीनची खरेदी प्रक्रिया अत्यंत संथ आहे.
२०१६ पासूनचे खरेदीचे अनेक प्रस्ताव अजूनही मार्गी लागलेले नाहीत, त्यामुळे सांगली सिव्हिलची एमआरआय यंत्रणेची खरेदी हाफकीनऐवजी शासनाच्या जीएम पोर्टलवरुन खरेदी करण्याचा प्रयत्न सुरु आहे. तसे झाल्यास येत्या वर्षभरात सिव्हीलमध्ये एमआरआय व सिटी स्कॅनिंग यंत्रणा कार्यान्वित होईल.दोन्ही यंत्रणांना यापूर्वीच मंजुरीसध्या या दोन्ही तपासण्यांसाठी सांगलीतून रुग्णांना मिरज सिव्हीलमध्ये पाठवावे लागते. बाह्यरुग्णांना चिठ्ठी दिली जाते, तर आंतररुग्णांची ने-आण करण्यासाठी रुग्णवाहिका व स्वतंत्र कर्मचारी नेमला आहे. सांगली-मिरज-सांगली प्रवासात रुग्णांचे हाल होतात, त्यामुळे सांगलीतच या दोन्ही यंत्रणा उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न सुरु होते, त्याला यशदेखील आले आहे.