माडग्याळ : एखादी गोष्ट साकारायची जिद्द दाखवली तर, ती साध्य करताच येते. याचे उदाहरण म्हणजे सनमडी (ता. जत) येथील शेतकरी तुकाराम बिराप्पा धायगुडे यांची शेती. कोकणातील शेती म्हणजे तांदळाचे आगर. महाराष्ट्रासह देशात कोकणच्या तांदळाला भलतीच मागणी आहे. तुकाराम धायगुडे यांनी कोकणातील इंद्रायणी भाताच्या वाणांची लागवड करून त्याचे भरघोस उत्पादन घेतले आहे.
ज्याप्रकारे कोकणात डोंगराच्या कुशीत निचरा होऊन झिरपणाऱ्या पाण्यावर भातशेती केली जाते, त्याचप्रकारे धायगुडे यांनी एक एकर क्षेत्रात भात लागवड केली. अशाप्रकारची शेती कोकणात आपल्याला दिसत होती; परंतु आता जतसारख्या दुष्काळी भागसुद्धा यामध्ये मागे राहिला नाही. धायगुडे यांनी जमिनीचा तसा पोत सुधारल्याने तांदळाचे चांगले उत्पादन मिळाले आहे.
धायगुडे हे गेल्या पाच-सहा वर्षांपासून बाजरी, तूर, ज्वारी आदी पिके घेत आहेत. परंतु जतसारख्या दुष्काळी भागात गेल्या दोन ते तीन वर्षांपासून चांगला पाऊस पडत आहे. म्हैसाळ योजनेच्या माध्यमातून कॅनॉलद्वारे घोलेश्वर, सनमडी येथे मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जाते. तसेच गेल्या दोन वर्षांत पावसाच्या अती पाण्यामुळे तूर, बाजरी ही पिो वाया गेली. त्यामुळे शेतात वेगळा प्रयोग करावा म्हणून त्यांनी भात शेती करण्याचे ठरवले. यासाठी त्यांनी भाताच्या इंद्रायणी वाणाची निवड केली.
योग्य नियोजनातून घेतले भरघोस उत्पादन
धायगुडे यांनी कशाचीही तमा न बाळगता जिद्दीने भातशेती यशस्वी करून दाखविला आहे. आता ते इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत. ते उच्चशिक्षित असून, शेतात वेगवेगळे प्रयोग करताना दिसतात. योग्य नियोजन केल्यास कोकणात पिकणारा उच्च प्रतीचा इंंद्रायणी तांदूळ जत तालुक्याच्या पूर्व भागातसुद्धा पिकवला जाऊ शकतो, हे धायगुडे यांनी सिद्ध करून दाखविले.