कामेरी : ग्रामीण भागातच महाराष्ट्राची संस्कृती जोपासली जाते. शहरी भागातील मुलांना एकत्र कुटुंबपध्दतीबाबत विचारले असता, आई-वडील एकत्र राहतात, यालाच एकत्र कुटुंबपध्दती म्हणतात, असे उत्तर त्यांच्याकडून मिळते. हा परिणाम दूरचित्रवाहिन्यांवरील विविध मालिकांमुळे त्यांच्या मनावर बिंबवला गेला आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर यांनी केले.कामेरी (ता. वाळवा) येथील सावित्री महिला मंडळाच्यावतीने आयोजित वात्सल्य भगिनी व्याख्यानमालेत ‘मिष्किली आणि कविता’ या विषयावर ते पहिले पुष्प गुंफताना बोलत होते. सिंहगड इन्स्टिट्यूटचे संचालक प्रकाश पाटील अध्यक्षस्थानी होते. या व्याख्यानमालेचे उद्घाटन उच्चस्तर न्यायाधीश कमलाताई बोरा, माजी आमदार विलासराव शिंदे, प्रकाश पाटील, सौ. छाया पाटील, आष्ट्याच्या नगराध्यक्षा सौ. मंगलादेवी शिंदे यांच्याहस्ते दीपप्रज्वलनाने झाले.नायगावकर म्हणाले, कवी हा हळुवार मनाचा असतो, असे म्हटले जाते; पण मी हळू केलेला वार म्हणजे हळुवार असे मानणाऱ्यांपैकी एक आहे. बुध्दीची कामे पुरुषांनी व अंगमेहनतीची कामे स्त्रियांनी करण्याचा नवा पायंडा पडू लागल्याने, आजही स्त्रियांना समाजात मान मिळत नाही आणि भविष्यातही मिळणे अवघड आहे. मानवाच्या दु:खावर अनेकांनी कविता लिहिल्या. पण भाजीपाला, फळे यांच्यावर कविता करणारा एकमेव कवी मी आहे, असे सांगत त्यांनी अनेक किस्से सांगून हा कार्यक्रम मिष्किली आणि हास्य कवितांचा आहे, हे दाखवून दिले. चौपाटीवरील टिळकांच्या पुतळ्याला उद्देशून सादर केलेली कविता व महिलांची ५० वर्षांपूर्वीची आणि आजची स्थिती यातील बदल अधोरेखित करणारी कविता त्यांनी सादर केली. यावेळी सौ. छाया पाटील यांनी प्रास्ताविक केले. सौ. रोझा किणीकर यांनी सूत्रसंचालन केले. कविता माने यांनी आभार मानले. (वार्ताहर)
ग्रामीण भागातच महाराष्ट्राची संस्कृती
By admin | Published: January 18, 2015 11:34 PM