घाटनांद्रे : कवठेमहंकाळ तालुक्यातील रत्नागिरी-नागपूर या राष्ट्रीय महामार्गालगत कुचीपासून ते पुढे सांगोला हद्दीपर्यंत हजारो बेदाणा निर्मिती शेड उभारले जात आहेत. या पट्यात बेदाणा निर्मितीस पोषक कोरडे व चांगले वातावरण आसल्याने उत्कृष्ट प्रतीच्या बेदाण्याची निर्मिती होते.
कवठेमहंकाळसह मिरज, खानापूर, आटपाडी, जत तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी आपली द्राक्षे बेदाणा निर्मितीसाठी येथील शेडचा उपयोग करतात. त्यामुळे स्थानिक लोकांनाही चांगल्या प्रकारे रोजगार निर्मिती होते. द्राक्षापासून निर्माण केलेल्या बेदाण्याला मोठी मागणी असते व दरही चांगला मिळत असल्याने अनेक शेतकऱ्यांचा ओढा बेदाणा निर्मितीकडे असतो. त्यातच सध्या द्राक्षाचे दर कोसळल्याने बरेच शेतकरी बेदाणा निर्मिती करून आपले नशीब आजमाविण्याची शक्यता आहे.
कुचीपासून ते पुढे सांगोला हद्दीपर्यंत म्हणजे कुची, शेळकेवाडी, आगळगाव, नागज, घोरपडी, चोरोची या भागात मोठ्या प्रमाणात बेदाणा निर्मितीसाठी शेड उभारली जातात. हिरव्या रंगाच्या बेदाण्याच्या निर्मितीसाठी पोषक हवामान व चांगल्या वातावरणामुळे येथे मोठ्या प्रमाणात बेदाणा निर्मितीचा व्यवसाय होतो.
या पट्यामध्ये थंड हवामान व उष्ण वातावरणामुळे बेदाणा लवकर सुकतो व चांगला रंग येतो. त्यातच वाहतुकीलाही रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्ग असल्याने त्याचा फायदाही या व्यवसायाला होतो.
कवठेमहंकाळ तालुक्यात रत्नागिरी-नागपूर या राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या शेडची संख्या लक्षात घेता शासनाने मार्केटिंगची सोय उपलब्ध करून दिल्यास ते फायदेशीर ठरणार आहे. शीतगृह उभारून सवलतीच्या दरात शेतकऱ्यांना दिल्यास त्याचा चांगला फायदा होणार आहे. तसेच वाहतुकीचा खर्चही त्यामुळे वाचणार आहे.
कोट
जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यात येथे लाखो टन बेदाणा तयार होतो. परंतु येथे शीतगृहाची सोय नसल्याने शेतकऱ्यांना बेदाणा साठविण्यासाठी सांगली, मिरज व तासगाव येथे स्टोअरमध्ये न्यावा लागतो. हे खर्चिक असल्याने शासनाने सवलतीच्या दरात येथेच शीतगृह उपलब्ध करून दिल्यास त्याचा मोठा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.
- संतोष पवार-पाटील, द्राक्ष उत्पादक शेतकरी, कुची
फोटो-१८घाटनांद्रे१ व २