मिरज : मिरज-तासगाव रस्त्यावर कुमठे फाटा येथे मोटारीने ठोकरल्याने अपघातात गंभीर जखमी झालेल्या तानाजी मारुती पाटील (वय ४५, रा. वारणाली, सांगली) या बेदाणा व्यापाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत मिरज ग्रामीण पोलिसांनी मोटारचालक महादेव अर्जुन सानप (वय ५०, रा. चिन्मय पार्क, यशवंतनगर, सांगली) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
रविवारी सायंकाळी साडेचार वाजता तानाजी पाटील (क्र. एमएच १० बीटी ७५६९) या दुचाकीवरून तासगाव फाट्याने कोल्डस्टोअरेजकडे जात हाेते. यावेळी पाठीमागून आलेल्या (क्र. एमएच १० सीएक्स ६५८२) या चारचाकीने त्यांना ठोकरले. अपघातात पाटील हे रस्त्यावर पडल्याने डोक्याला मार लागून गंभीर जखमी झाले. अपघातानंतर चारचाकी चालकाने पलायन केले. जखमी पाटील यांना उपचारासाठी मिरजेत खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना मंगळवारी रात्री तानाजी पाटील यांचा मृत्यू झाला. दुचाकीस्वार पाटील यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल महादेव अर्जुन सानप या चारचाकी चालकाविरुद्ध ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.