सध्या सांगलीत पेट्रोलचा दर ९७.३५ रुपये आहे. हाच दर ६५ ते ७० च्या घरात असताना वाहनधारक रस्त्यावर उतरल्याचेही काही वर्षांपूर्वी पाहिले होते; पण आता मात्र तो केवळ सोशल मीडियावरच व्यक्त होत आहे. भाजीपाला मार्केटमध्ये घासाघीस करून २० रुपयांची भाजी १५ रुपयाला घेतल्यानंतर छाती फुगवून जाणारा हाच ग्राहक पेट्रोल पंपावर मात्र मौन पाळून असल्याचे दिसून येते. इंधन आता जीवनाचा अविभाज्य घटक बनल्याने दरवाढ ही ग्राहकांच्या अंगवळणी पडल्याचे चित्रही दिसत आहे.
चौकट
शहरातील पेट्रोल पंप : ३५
दररोज विक्री होणारे डिझेल : ८७,००० लिटर
दररोज विक्री होणारे पेट्रोल : ७०,००० लिटर
चौकट
पंपावर पेट्रोल, डिझेल टाकताना घ्या काळजी
रीडिंग झिरो आहे, हे आधी पाहावे. तेल टाकत असताना काही हातचलाखी केली जात आहे का, ते पाहावे. तेल टाकत असताना लक्ष इतरत्र विचलित होऊ देऊ नये. काही शंका आल्यास प्रत्येक पंपावर पाच लिटरचे प्रमाणित माप उपलब्ध असते. त्याद्वारे खात्री करावी.
चौकट
वर्षभरात केवळ दहा तक्रारी
१. पेट्रोल पंपावर गेल्यानंतर अनेक कर्मचाऱ्यांकडून थेट इंधन गाडीत सोडले जाते. शून्याचे आकडे येईपर्यंतही थांबले जात नाही. जागृत ग्राहक म्हणून सावध राहण्याची आवश्यकता आहे.
२. अनेकदा गाडीत पेट्रोल टाकले तरी स्पीडमीटरमधील काटा हललेला दिसत नाही. तेव्हा ग्राहकांना इंधन कमी घातले की काय, अशी शंका येते.
३. अशा वेळी इंधन योग्यरीत्या दिले जाते की नाही, याची तपासणी आवश्यक आहे. त्यासाठी पेट्रोल पंपावर पाच लिटरचे माप ठेवलेले असते. त्यातून आपण शहानिशा करू शकतो.
चौकट
नियमित होते तपासणी
शहरातील सर्वच पेट्रोल व डिझेल पंपांची तपासणी जिल्हा पुरवठा विभागाकडून केली जाते. प्रत्येक पेट्रोल पंपातील सॅम्पल घेऊन ते प्रयोगशाळेकडे पाठविले जाते; परंतु त्यानंतर कार्यवाही काय होते, हे मात्र गुलदस्त्यात राहते.
चौकट
कोट
पेट्रोल, डिझेल हे ग्राहकांना देताना पंपचालकांनी नियमांचे पालन केले पाहिजे. त्यातूनही ग्राहकांकडून आमच्याकडे तक्रारी येतात. त्याची दखल घेऊन पुरवठा विभाग व वैधमापन विभागाच्या संयुक्त पथकाकडून तपासणी केली जाते. तपासणीत दोष आढळून आल्यास कारवाईही केली जाते.
- वसुंधरा बारवे, जिल्हा पुरवठा अधिकारी.