शरद जाधव ।सांगली : बॅँकिंग फसवणूक, फेसबुक, व्टिटर, व्हॉटस्-अॅपच्या माध्यमातून होणारा गैरवापर, अफवा पसवरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये प्रयत्न होत आहेत. त्याचबरोबर आर्थिक फसवणुकीचे प्रकारही घडत आहेत. या वर्षभरात सायबर सेलकडे ३५ तक्रारी दाखल झाल्या असून, महिन्याकाठी तीन तक्रारी दाखल होत असल्याचे चित्र आहे. दाखल तक्रारीपैकी १२ गुन्हे उघडकीस आणण्यात पथकाला यश मिळाले आहे. तर उर्वरित गुन्ह्यांंचा तपास गतीने सुरू आहे.
बदलते जीवनमान, तंत्रज्ञानाचा वाढता वापर यामुळे जग आपल्या कवेत आले असले तरी, त्यातून आव्हानांची मालिकाच निर्माण होत आहे. मोबाईल, संगणकाच्या माध्यमातून होणारे गुन्हे रोखण्यासाठी पोलीस दलातील सायबर क्राईम शाखा कार्यरत असून, अनेक आव्हानात्मक गुन्ह्यांचा छडा या टीमने लावला आहे. मोबाईल चोरीपासून ते सोशल मीडियावरील आक्षेपार्ह मजकुर, महिलांच्या फोटोंचे होणारे दुरूपयोग यासह बॅँकिंग फसवणुकीच्या प्रकरणातही सायबर क्राईमची भूमिका महत्त्वाची ठरत आहे.
आयपीसी अॅक्टप्रमाणेच वाढत्या सायबर क्राईमच्या घटना लक्षात घेता २००० पासून आयटी अॅक्टची अंमलबजावणी सुरू झाली; तर सांगलीत ७ जुलै २०१७ ला स्वतंत्र सायबर पोलीस ठाण्याची स्थापना करण्यात आली. तंत्रज्ञानाचा वापर करून होणारी फसवणूक टाळण्याबरोबरच सध्या सर्वांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनलेल्या सोशल मीडियावर नियंत्रण ठेवण्याचे काम हा विभाग करतो आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या १० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर या वर्षभरात चोरीला गेलेल्या मोबाईलचे ४६ गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहेत.
मोबाईलवर अज्ञात क्रमांकावरून फोन येऊन एटीएमचा पीन क्रमांक विचारला जातो. यातून आर्थिक फसवणूक मोठ्या प्रमाणात होत असून, अशाच तक्रारीचे प्रमाण अधिक आहे. त्याचबरोबरच ओएलएक्सवर वाहन खरेदीची जाहिरात टाकून त्याव्दारेही फसवणुकीचे प्रकार घडत आहेत. ई-मेलवर संदेश पाठवून ती लिंक ओपन केल्यास ‘मेलवेअर अॅटॅक’ (व्हायरस)चा धोका वाढत आहे. या गुन्ह्याचा तपास करताना सायबर क्राईम पोलीस ठाण्याचा कस लागत आहे.
सोशल मीडियावर विशेष नजरसोशल मीडियाच्या माध्यमातून गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असल्याने त्यासाठी ‘सोशल मीडिया मोनटरिंग सेल’ कार्यान्वित करण्यात आला आहे. सोशल मीडियावर विशेषत: महिलांच्या फोटोचा गैरवापर होत आहे. बनावट खाते काढून महिलांच्या फोटोंचे ‘मॉर्फिंग’ करून गैरवापर होत असल्याच्या तक्रारीही येत असल्याने सोशल मीडियातील गुन्ह्यांवर लक्ष आहे.
अशी घ्या काळजी
- महिलांनी सोशल मीडियावर ‘डिपी’ ठेवताना तो सुरक्षित करून घेण्यास प्राधान्य द्यावे.
- महिलांनी फेसबुक, व्हॉटस्-अॅपला फोटो ‘पोस्ट’ करताना काळजी घ्यावी.
- कमी किमतीत मिळतात म्हणून बिलाशिवाय, चोरीच्या मोबाईलची खरेदी करू नये.
- ‘ओळखा पाहू’ सह इतर शंकास्पद बक्षीस योजनांमध्ये सहभागी होणे टाळावे.
- वैयक्तिक माहिती, अपडेट सोशल मीडियावर देणे टाळावे.
पोलीस अधीक्षक सुहैल शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सायबर गुन्हे रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. जनतेनेही अधिक सजग राहून आपली वैयक्तिक माहिती कोणाला न देता संभाव्य फसवणुकीपासून सतर्क रहावे व विभागास सहकार्य करावे.
- बी. जी. कांबळे, सहा. पोलीस निरीक्षक, सायबर क्राईम पोलीस ठाणे