सांगली : डी. एड्. शिक्षणक्रमासाठीची विशेष फेरी २७ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार शासनाने आणखी एक संधी उपलब्ध करून दिली आहे. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण (डाएट) चे प्राचार्य डॉ. रमेश होसकोटी यांनी ही माहिती दिली.
२०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी शासकीय कोट्यातील प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन स्वरुपात सुरू आहे. पहिल्या तीन फेऱ्यानंतरही शासकीय कोट्यातील काही जागा रिक्त राहिल्या आहेत. त्या भरण्यासाठी शासनाने विशेष फेरी जाहीर केली आहे. त्यानुसार प्रथम येणाऱ्यास प्राधान्य आहे. खुल्या वर्गातून ४९.५ टक्के व खुला संवर्ग वगळून ४४.५ टक्के गुणांसह बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना ही संधी उपलब्ध आहे. २२ ते २६ डिसेंबरपर्यंत ऑनलाईन प्रवेश अर्ज भरता येतील. पडताळणी २७ डिसेंबरपर्यंत होईल. यापूर्वी अर्ज भरुनही प्रवेश न घेतलेले विद्यार्थीही पुन्हा प्रवेश घेऊ शकतात. विद्यार्थ्याने अपेक्षित महाविद्यालयाची निवड स्वत:च करायची आहे. ऑनलाईन प्रक्रियेची प्रिंट घेऊन चार दिवसांत प्रत्यक्ष महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा आहे. प्रवेश प्रक्रियेला पुन्हा नव्याने मुदतवाढ मिळणार नसल्याचे प्रा. होसकोटी म्हणाले.
-------------