कोकरुड : जिल्हा बंदी असतानाही बिळाशी (ता. शिराळा) येथे अवैधरीत्या दारूची वाहतूक केल्या प्रकरणी सोंडोली (ता. शाहूवाडी) येथील दोघांवर कारवाई करून देशी दारूच्या ४८ बाटल्यांसह ३२ हजार ४९६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याबाबत कोकरुड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सोमवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास पोलिसांचे गस्तीपथक गस्त कोकरुड-शिराळा रोडवर गस्त घालत असताना सोंडोली येथील आनंदा गुंगा पाटील (वय ४०) व बाळू गुंगा पाटील (वय ४४) हे दोघे जण मोटरसायकलवरून (क्र. एमएच ०१ एजी ५००१) भेडसगाव येथून बिळाशीकडे येत असताना गस्ती पथकाने त्यांची चौकशी करून तपासणी केली. त्यांच्याकडे देशी दारूच्या ४८ बाटल्या आढळून आल्या. त्यांच्यावर कारवाई करत मोटरसायकलसह ३२ हजार ४९६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोकरुड पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक ज्ञानदेव वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली गस्ती पथकातील अझर गवंडी, हिंदुराव पाटील, विशाल भोसले, मोहसीन मुल्ला यांनी ही कारवाई केली.