वाळवा : दुग्ध व्यवसायात हिशेब हा रुपयात न करता पैशात करावा लागतो. म्हणून एक एक पैशाचा विचार केला पाहिजे, असे प्रतिपादन हुतात्मा दूध संघाचे संस्थापक वैभव नायकवडी यांनी केले.
वाळवा येथील हुतात्मा (मल्टिपर्पज) सहकारी दूध संघाच्या २४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष गौरव नायकवडी होते.
वैभव नायकवडी म्हणाले, खरेदी दर कमी तिथून भरपूर दूध मिळविणे आणि जिथे दूध दर जास्ती तिथे विक्री करणे हे या व्यवसायात महत्त्वाचे आहे. यावर्षी सर्वच धंद्यांवर आर्थिक परिणाम झालेला आहे, त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सर्वजण शोधत आहेत. हुतात्मा दूध संकलन एकदम गतीने वाढवू नका. पावडरीला दूध गेल्यास तोटा होईल.
गौरव नायकवडी म्हणाले, महापूर व कोविडने प्रचंड नुकसान झाले. सहकारी दूध संघांना शासन निर्णयाप्रमाणे जावे लागते. दूध संघाला शेतकरी व सभासदांना विचारात घेऊन निर्णय घ्यावे लागतात, परंतु मार्केट काही आपल्या हातात नाही.
यावेळी क्रांती साखर कारखाना उपाध्यक्ष उमेश जोशी, हुतात्मा साखर उपाध्यक्ष बाबूराव बोरगावकर, दूध संघाचे उपाध्यक्ष भगवान पाटील, आनंदराव शिंदे, महादेव कांबळे, बाळासाहेब पाटील, यशवंत बाबर, महादेव माने, आप्पासाहेब रेडेकर, अकौंटंट मॅनेजर दीपक पाटील उपस्थित होते. दिलीप सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले. यशवंत बाबर यांनी आभार मानले.
फोटो-२८वाळवा१