देवराष्ट्रे : ऐन उन्हाळ्यात गाय व म्हैस दूध दर गडगडले आहेत; तर याउलट पशुखाद्य दराचा भडका उडाला आहे. दूध दर २३ रुपये लीटरपर्यंत घसरले असताना, पशुखादय मात्र ३० ते ३२ रुपये किलो झाले आहे. कोरोना संकटाने सलग दुसऱ्या वर्षी शेतकऱ्यांना हा आर्थिक फटका बसला आहे.
लाॅकडाऊन काळात पशुखाद्य ३ ते ५ रुपये प्रति किलो महागले आहे.
गत वर्षी ऐन उन्हाळ्यात दुधाची कमतरता भासू लागली होती. अशा वेळी दुधाच्या दरात मोठी वाढ होऊन दूध उत्पादकांना दिलासा मिळणार होता, पण अचानक आलेल्या कोरोना संकटाने दूध व्यवसायाची मोठी हानी झाली. शेतकऱ्यांनी दुभती जनावरे व्यापाराच्या दावणीला बांधली. गत वर्षाचे कोरोना संकट दूर होऊन पुन्हा दूध व्यवसायात आशादायी चित्र निर्माण होऊ लागले होते, पण या वर्षीही कोरोना संकटाने दुधात मिठाचा खडा टाकत व्यवसायाला पुन्हा ब्रेक लावण्याचे काम केले आहे. वाढते पशुखाद्याचे दर दूध उत्पादकांसाठी चिंतेचा ठरत आहे.
स्थानिक सहकारी दूध संघांनी कोरोनाच्या भीतीने दूध दर कमी करत, गायीच्या दुधाचा दर २३ रुपयांपर्यंत घटविला आहे, याउलट पशुखाद्याचे दर गगनाला भिडले आहेत. कच्च्या मालाचे दर वाढल्याचे कारण देत, अनेक पशुखाद्य कंपन्यांनी पशुखाद्य दरात भरमसाठ वाढ केली आहे. सरकीपेंड १७००, गोळी १,६५०, खपरी १,४००, मकाचुनी ९५०, अट्टा १,०५० यासह सर्वच खाद्याचे दर भडकल्याने, दूधउत्पादक शेतकरी मेटाकुटीला आला आहे.
चौकट
चाराटंचाई
पशुखाद्याचे दर सातत्याने वाढत असताना, पशुपालकांसमोर चाराटंचाईची समस्या निर्माण होऊ लागली आहे. वाळला चारा, मका मिळेनासा झाला आहे. त्यातूनही चारा मिळाला तर अधिक पैसे देऊन खरेदी करावे लागत आहेत.