सांगली : महापालिकेतील दांडीबहाद्दर अधिकारी व कर्मचाऱ्यांवर प्रशासन अधिकाऱ्यांनी कारवाईचा बडगा उगारल्यानंतर आज (बुधवारी) खुलाशासाठी साऱ्यांचीच धावपळ उडाली होती. प्रशासन अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून कल्पना देऊनच बहुतांश अधिकाऱ्यांनी कार्यालय सोडले. दरम्यान, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेल्या खुलाशाचा अहवाल उद्या, गुरुवारी आयुक्तांकडे सादर केला जाणार असल्याचे सहायक आयुक्त रमेश वाघमारे यांनी सांगितले. महापालिकेतील अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांची आॅन ड्युटी भटकंती सुरू होती. काल हालचाल रजिस्टरला नोंदी न करताच अनेकांनी कार्यालय सोडले होते. त्यामुळेच महापालिकेचे प्रशासन अधिकारी तथा सहायक आयुक्त रमेश वाघमारे यांनी मंगळवारी महापालिकेच्या सर्व विभागांना अचानक भेटी दिल्या. एका दिवसात तब्बल ३९ अधिकारी, कर्मचारी त्यांना गैरहजर आढळून आले. हालचाल रजिस्टरला कोणतीही नोंद न करता अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कार्यालय सोडल्यामुळे वाघमारे यांनी त्यांना नोटिसा बजावून खुलासा मागविला होता. या कारवाईने अधिकारी व कर्मचाऱ्यांत खळबळ उडाली होती. बुधवारी सकाळपासूनच दांडीबहाद्दर अधिकारी व कर्मचारी कार्यालयात थांबून होते. (प्रतिनिधी) खुलाशाचा प्रयत्नएखाद्या अधिकाऱ्याला कार्यालय सोडण्याचा प्रसंग आला, तर संबंधित अधिकारी वाघमारे यांच्याशी संपर्क साधून कल्पना देत होते. अनेकांनी तर ‘पालिकेच्या कामासाठीच कार्यालयाबाहेर होतो’, असा खुलासा करण्याचा प्रयत्नही केला आहे.
पालिकेचे दांडीबहाद्दर अधिकारी वरमले
By admin | Published: January 07, 2015 11:07 PM