सांगली : छत्रपती संभाजी महाराज यांनी संस्कृतमधून बुधभूषणसह तीन ग्रंथ लिहिले असूनही ते अनेकांना माहीत नाहीत. याशिवाय महाराजांनी ३२० लढाया केल्या असून, त्यात त्यांनी एकदाही पराभव पत्करला नाही. परंतु, मनुवादी प्रवृत्तीने हा खरा इतिहास उजेडात आणलाच नाही, अशी टीका मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष दिनकर पाटील यांनी केला. सांगलीतील मराठा सेवा संघाच्या कार्यालयात छत्रपती संभाजी महाराज आणि गौतम बुध्द यांना जयंतीनिमित्त पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून दिनकर पाटील बोलत होते. ते पुढे म्हणाले की, छत्रपती संभाजी महाराजांचे कार्य मोठे असूनही ते बहुजन समाजासमोर आले नाही. काही जुन्या संदर्भग्रंथानुसार संभाजी महाराजांनी चौदाव्या वर्षी संस्कृतमधून ‘बुधभूषण’हा ग्रंथ लिहिला आहे. सातशतक, नाईकाभेद, नकशिक हे हिंदीतून ग्रंथ लिहिले असून, ते संभाजी महाराज आम्हाला माहीतच नव्हते. संभाजी महाराजांनी एकूण ३२० लढाया केल्या असून, त्यापैकी एकदाही त्यांनी पराभव पत्करला नाही. परंतु, मनुवादी वृत्तीच्या मंडळींनी जाणीवपूर्वक हा इतिहास लपविला असल्याची टीकाही त्यांनी केली. ते म्हणाले की, संस्कृतमधून ग्रंथ लिहिल्यानेच मनुस्मृतीनुसार संभाजी महाराजांची हत्या करण्यात आली आहे. परंतु, बहुजन समाजातील इतिहास अभ्यासकांनी संभाजी महाराजांचा खरा इतिहास मांडण्याची गरज आहे. यासाठी मराठा सेवा संघ नेहमीच त्यांच्या पाठीशी ठाम उभा राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी श्रीरंग पाटील, अमृतराव सूर्यवंशी, आशा पाटील, निर्मला पाटील, उमेश शेवाळे, विलास देसाई आदींसह मोठ्यासंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. प्रास्ताविक नितीन चव्हाण यांनी केले. डॉ. संजय पाटील यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
संभाजी महाराजांचा खरा इतिहास लपविला दिनकर पाटील : मराठा सेवा संघातर्फे संभाजी महाराज, गौतम बुद्धांना अभिवादन
By admin | Published: May 15, 2014 12:46 AM