सांगली : महापालिकेने नागरी सुविधा पुरवाव्यात, या मागणीसाठी दलित महासंघाच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर दंडवत मोर्चा काढला. आतापर्यंतचे हे १४ वे आंदोलन आहे. येत्या काही दिवसांत नागरी सुविधा न पुरविल्यास महापालिकेसमोर आत्मदहन केले जाईल, असा इशारा देण्यात आला.विश्रामबाग येथील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून दंडवत मोर्चास प्रारंभ झाला. जिल्हाधिकारी कार्यालयावर गेल्यानंतर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. कर्नाळ रस्ता, शिवनगर, मगरमच्छ कॉलनी, शिवशंभो चौक, दत्तनगर, साईनगर, वाल्मिकी आवास, जुना बुधगाव रस्ता, रेपे प्लॉट, पंचशीलनगर, शिंदे मळा, लक्ष्मीनगर या भागात रहात असलेल्या बहुजन समाजाला विकास कामांसाठी निधी मंजूर झाला आहे. तरीही याठिकाणी कामे पूर्ण करण्यात आलेली नाहीत.
महापालिकेतील सत्ताधारी व आयुक्तांनी जाणीवपूर्वक या भागाला सुविधांपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. याचा जाब विचारला, तर उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. आयुक्तांना बडतर्फ करून त्यांच्याविरुद्ध अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा. विकास कामे सुरू न केल्यास पालिकेसमोर आत्मदहन केले जाईल, असा इशारा दिला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांना निवेदन दिले आहे.जिल्हाध्यक्ष उत्तम मोहिते, दिलीप शेलार, वनिता कांबळे, विक्रम भिंगारदिवे, उषा मोहिते, शोभा देवकुळे, सुनील वारे, राकेश चंदनशिवे, राजू खैरे, कल्पना चव्हाण, विठाताई देवकुळे, शोभा सालपे, सागर कांबळे, शीतल मोहिते यांच्यासह लहान मुलेही या आंदोलनात सहभागी झाली होती.