कोकरूड : शिराळा-शाहूवाडी तालुक्याला जोडणारा कोकरूड-रेठरे वारणा बंधारा सोमवारी रात्रीपासून पाण्याखाली गेल्याने या मार्गावरून होणारी वाहतूक बंद झाली आहे. वारणा पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरूच आहे. गेल्या दहा दिवसांपासून शिराळा पश्चिम भागात संततधार पावसाला सुरुवात झाली आहे. वारणा पाणलोट आणि धरण क्षेत्र व अभयारण्य परिसर तसेच डोंगर पठारावर दररोज पावसाच्या सरी कोसळत असल्याने ओघळी, ओढे, नाली तुडुंब भरून वाहत आहेत. चार-पाच दिवसांपासून पावसाचा आणखी जोर वाढल्याने वारणा नदी भरून वाहत आहे. पावसाचे पाणी आणि धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे काही पोटमळ्यातही पाणी घुसले आहे. कोकरूड येथील वारणा नदीवर असणारा आणि शाहूवाडी तालुक्याला जोडणारा कोकरूड-रेठरे बंधारा सोमवारी रात्रीपासून पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. दोन दिवसांपूर्वी बंधारा काही काळासाठी पाण्याखाली गेला होता. बंधारा बंद झाल्याने सध्या तुरुकवाडी आणि चरण या मार्गावरून वाहतूक सुरळीत सुरू आहे.
शिराळा-शाहूवाडी तालुक्याला जोडणारा बंधारा पाण्याखाली, वाहतूक ठप्प
By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2024 11:53 AM