सांगली - चांदोली धरण पूर्ण झाले त्यासाठी आम्ही आमच्या घरादारावर तुळशीपत्र ठेऊन बाहेर पडलो. आमच्या चार पिढ्या खपल्या तरीही शासनाकडून अद्याप आमचे विकसनशील पुनर्वसन सुरूच आहे. आता थकीत कब्जेपट्टीच्या लाखो रुपयांच्या नोटीसा पाठवून सरकार धरणग्रस्तांची थट्टा करत आहे. या नोटिसा मागे घ्या आणि आमच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करा, असे ठणकावत धरणग्रस्तांनी येथील तहसील कार्यालयासमोर ठिय्या. यावेळी नोटिसांची होळी करत सरकारचा जोरदार निषेध करण्यात आला.
धरणग्रस्त कृती समितीचे नेते गौरव नायकवडी, बाळासाहेब नायकवडी, प्राचार्या डॉ. सुषमा नायकवडी, भारत पाटील, बळीराजा संघटनेचे बी.जी.पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज धरणग्रस्त कुटुंबांनी मोर्चा काढला. पेठ रस्त्यावरील प्रांताधिकारी कार्यालयापासून हा मोर्चा शहरातील प्रमुख मार्गावरून तहसील कचेरीवर येऊन धडकला. तेथे सभा झाली.
मोर्चेकऱ्यांनी सरकारचा निषेध करताना संघर्ष गीते गाऊन वातावरण तापवले होते.चार पिढ्या खपल्या तरी तोच त्वेष आणि लढण्याची जिद्द दाखवून देत धरणग्रस्तांनी आज पुन्हा सरकारला अंगावर घेण्याची तयारी जाहीर केली. शासनाने धरणग्रस्तांना जमिनी दिल्या आहेत. त्याच्या थकीत कब्जेपट्टीच्या लाखो रुपयांच्या नोटिसा पाठवल्याने त्यांच्यात असंतोष उफाळून आला आहे. त्याचा जोरदार निषेध करण्यात आला. सर्वच वक्त्यांनी सरकारच्या या धोरणावर टीकेचे आसूड ओढले. सरकारने या नोटिसा रद्द कराव्यात आणि प्रलंबित मागण्या लवकर पूर्ण कराव्यात. या मागण्या मान्य होईपर्यंत धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला.
अण्णा आणि नाना..!
धरणग्रस्तांच्या मोर्चाने क्रांतिवीर डॉ.नागनाथअण्णा नायकवडी आणि धरणग्रस्तांचे शेलार मामा म्हणून ज्यांना ओळखले जायचे त्या कॉ. नाना शेटे यांच्या आठवणी जाग्या झाल्या.जुनी कचेरी आणि त्यासमोरील लिंबाचे झाड आज नसले तरीही तो माहोल अनुभवायला मिळाला. निर्वाह भत्ता आणि इतर मागण्यांसाठी २००५ मध्ये तब्बल २० दिवसांचा ठिय्या दिला होता. अण्णांची मदत आणि नाना शेटे यांचा लढवय्या बाणा यामुळे सरकारला नमते घ्यायला लावत भत्ता घेऊनच हे आंदोलन थांबले होते.अशा अनेक आठवणी जाग्या झाल्या.