सांगली : जिल्ह्यात गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टी व महापूरस्थितीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. जमीन खरबडून जाणे, गाळ साचणे, गाळ, वाळूचा थर तीन इंचापेक्षा जास्त साचणे यामुळे १८१ गावांतील ९२५ हेक्टरवरील क्षेत्राचे नुकसान झाले आहे.
अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यातील कृषी क्षेत्राला मोठा फटका बसला असून, यामध्ये मिरज, वाळवा, शिराळा व पलूस या चार तालुक्यांतील १८१ गावांमधील आठ हजार ८ शेतकऱ्यांच्या ९२५ हेक्टर जमिनीचे नुकसान झाले आहे. यामध्ये मिरज तालुक्यातील १०, वाळवा ५६, शिराळा ९५, पलूस २० गावे बाधित झाली आहेत. यामध्ये चार हजार १९० शेतकऱ्यांच्या ४५५ हेक्टरवरील जमीन खरवडून गेली आहे, तर तीन हजार ८१८ शेतकऱ्यांच्या ४७० हेक्टरवरील जमिनीवर गाळ, वाळू, मातीचा थर तीन इंचापेक्षा जास्त साचल्याने नुकसान झाल्याचा अहवाल कृषी विभागाने तयार केला आहे.