वारणा पट्ट्यात प्रामुख्याने ऊस शेतीला प्राधान्य दिले जाते. शेतीला जोडधंदा म्हणून दूध व्यवसायाकडे पाहिले जाते. गेल्या दोन वर्षांपासून वारणा नदीच्या महापुराने ऊस शेती उद्ध्वस्त होत आहे. ऊस शेतीचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. यामुळे उसाचे वजन व उतारा घटणार आहे. खरीप हंगामात ऊस, सोयाबीन, भुईमूग, आडसाली लागणीच्या पिकांत पुराचे पाणी गेल्यामुळे मोठे नुकसान हाेणार आहे.
सध्या शिवारात पिके कुजल्याने दुर्गंधीचे पसरली आहे. शेतकऱ्यांना नवीन पिकांसाठी पुन्हा अर्थिक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. अशातच अनेक शेतकऱ्यांची दुभती जनावरेही दगावली आहेत. यामुळे मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. २०१९च्या पुरातून अद्याप शेतकरी सावरलेला नाही. तोपर्यंत पुन्हा महापुराच्या तडाख्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित काेलमडले आहे.