मिरजेत कृष्णा घाटावर नदीची पाणीपातळी ६६ फुटांवर पोहोचल्याने कृष्णा घाट परिसरासह मिरजेतील राजीव गांधीनगर, चांद काॅलनीत पुराचे पाणी शिरले. पुरामुळे येथील हजारो नागरिकांना स्थलांतर करावे लागले. पूर ओसरण्यास सुरुवात झाल्यानंतर गेल्या चार दिवसांत दहा फूट पाणीपातळी कमी झाली आहे. यामुळे नदी पुन्हा पात्रात परतली आहे. मात्र नदीकाठावरील हजारो हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. धरणातून विसर्गामुळे पुन्हा पाणीपातळी वाढण्याच्या शक्यतेमुळे कृष्णा घाटावरील अनेक नागरिक अद्याप निवारा केंद्रातच आहेत.
मिरजेत कृष्णा नदीवर १९९४ मध्ये बांधलेल्या २१४ मीटर लांबीच्या पुलाची वारंवार बांधकाम विभागाकडून दुरुस्ती सुरू आहे. पावसाळ्यापूर्वी पुलाचे बेअरिंग बदलण्याचे काम करण्यात आले होते. मात्र गेल्या आठवड्यात नदीवरील पूल पुराच्या पाण्यात बुडाल्याने पुलाच्या संरक्षक कठड्याचे नुकसान झाले आहे. त्यामुळे बांधकाम विभागाकडून पुलाची दुरुस्ती करण्यात येणार आहे.