कोकरुड : अतिवृष्टी आणि पुराच्या पाण्याने नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी शिराळा तालुक्यातील सर्वपक्षीय नेते गावागावात जात आहेत. मात्र, दौऱ्यामुळे लोकांच्या हातात नेमके काय आणि किती रक्कम पडणार, याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
यावर्षी ढगफुटीसदृश पाऊस पडल्याने घरे, शेती, डोंगर, रस्ते, पूल, महावितरणचे मोठे नुकसान झाले आहे. गेल्या चार दिवसांपासून पावसाने उघडिप दिल्याने शिराळा तालुक्यातील आमदार मानसिंगराव नाईक, माजी मंत्री शिवाजीराव नाईक, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सत्यजित देशमुख, युवानेते सम्राट महाडिक, मनसे जिल्ह्याध्यक्ष तानाजीराव सावंत, राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष विराज नाईक, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य हणमंत पाटील या सर्वपक्षीय नेत्यांनी तसेच प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, तहसीलदार गणेश शिंदे, गटविकास अधिकारी डॉ. अनिल बागल यांनी तालुक्यातील नुकसानीची पाहणी केली. अतिवृष्टी आणि पुराच्या पावसाने नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे डोळे शासनाची मदत आणि नुकसान भरपाईकडे लागले आहेत. मतदारसंघात भेटी देऊन पाहणी करून गेलेल्या सर्वपक्षीय नेत्यांनी शेतकऱ्यांना वस्तुनिष्ठ पंचनामा करून योग्य ती नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी शासनाकडे प्रयत्न करावेत, अशी आशा निर्माण झाली. सगळ्यांच्या नजरा शासनाच्या पॅकेजकडे लागल्या आहेत.