अविनाश बाड आटपाडी : ज्या डाळिंबाने दुष्काळी आटपाडीकरांना समृद्धीचे स्वन दाखविले, त्या डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांवर आता डोळे पांढरे होण्याची वेळ आली आहे. गेल्या २२ वर्षांत यंदा प्रथमच दहा हजारहून अधिक एकरवरील डाळिंब बागांना फलधारणाच झाली नाही. ज्या झाडांना २०० ते २५० डाळिंबे लागायची तिथे फक्त १० ते १२ फळे लागली आहेत. फलधारणेसाठी शेतकऱ्यांनी नेहमीपेक्षा दुप्पट-चौपट खर्च केला आहे.आटपाडी तालुक्यात सध्या फक्त डाळिंब हेच नगदी पीक आहे. या भागातील वातावरणात दर्जेदार उत्पन्न देणारे डाळिंब यंदा मात्र तालुक्यावर रुसले आहे. २०१७ आणि २०१८ ही वर्षे दुष्काळाची गेली. २०१७ मध्ये तालुक्यात ४१५ मि. मी. पावसाची नोंद असली तरी, ५ महिन्यात ४० दिवसांच्या अंतराने पडलेल्या पावसाची नोंद आहे.
२०१७ मध्ये १ ते २ मि. मी. पासून १५ मि. मी. पर्यंतच्या कसलाही उपयोग न होणाऱ्या ३१ दिवसांच्या पावसाची नोंद आहे. त्यामुळे एकूण आकडेवारी फुगली. दि. ७ सप्टेंबर २०१७ रोजी तालुक्यात सरासरी ६८ मि. मी. एवढा एकच दिवस पाऊस पडला. त्यानंतर २०१८ मध्ये दि. १८ नोव्हेंबर रोजी तालुक्यात सरासरी ५६ मि. मी. पाऊस एका दिवशी पडला.
बाकी विरळ पावसाचे ७ दिवस मिळून १८६ मि. मी. एवढा पाऊस पडला. पावसात एवढा मोठा खंड पडल्याने डाळिंबाची अवस्था वाईट झाली. त्यात उन्हाळ्यात मे महिन्यात ४० अंशापेक्षा जास्त तापमान १५ दिवसांपेक्षा अधिक दिवस राहिले. यंदाही पावसाने तालुक्याकडे पाठ फिरवली आहे.
शेतकऱ्यांनी जून महिन्यात डाळिंबाचा मृग बहर विकतचे पाणी टॅँकरने घालून धरला. पण आटपाडी तालुक्यातील डाळिंबाच्या इतिहासात यंदा प्रथमच फळधारणाच झाली नाही. तेल्या रोगाच्या आक्रमणापेक्षा हे वाईट आहे. बहर धरल्यावर कळी २२ व्या दिवशी झाडावर दिसते. तर ३५-३६ व्या दिवशी सेटींग (फलधारणा) होते.
सव्वा महिन्यात फलधारणा होणे अपेक्षित आहे. यंदा कळ्या लागतात; पण त्याला फळ लागण्याऐवजी फांदीवर हिरव्या काड्या म्हणजे फुटवा वाढत आहे. दरवर्षी खोडालाही फुटवा असतो. शेतकरी फळाचे अन्न फुटव्याला जाऊन झाड, फळे, अशक्त होऊ नयेत म्हणून काढतात. यंदा जूनपासून दर ११ व्या दिवशी फुटवा येतो. १५ व्या दिवशी शेतकरी काढतात. असे ७ ते ८ वेळा झाले आहे. नुसता खर्च वाढत आहे.