इस्लामपूरमधील प्रभाग ५ मधील गल्ली-बोळातील रस्ते चकाचक होत आहेत. प्रभाग ६ मधील रस्ते आजही शेवटचा श्वास घेत आहेत.
अशोक पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : शहरातील प्रभाग पाचमधील अधिक काळ रखडलेले रस्ते आता चकाचक होऊ लागले आहेत. याउलट बाजूसच असलेल्या प्रभाग सहामध्ये लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे रस्ते अखेरच्या घटका मोजू लागले आहेत. रस्त्यासाठी दुजाभाव का, याबद्दल नागरिकांतून उलट-सुलट चर्चा सुरू आहे.
शहरातील रस्ते, गटारींसाठी उपलब्ध झालेल्या निधीवरून सत्ताधारी विकास आघाडी आणि विरोधी राष्ट्रवादीमध्ये श्रेयवाद रंगला आहे. प्रभाग सहामधील रस्ते होण्यासाठी येथील नागरिकांनी निवेदने देऊनही अद्यापही रस्ते झालेले नाहीत. या प्रभागातील राष्ट्रवादीचे नगरसेवक बशीर मुल्ला आणि नगरसेविका सविता आवटे हे, रस्ते होणार असे सांगतात, तर सत्ताधारी विकास आघाडीचे कार्यकर्ते बंडा रासकर आणि आशा पवार यांनीही याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे या प्रभागातील नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे.
याउलट प्रभाग पाचमध्ये सत्ताधारी विकास आघाडीचे पक्षप्रतोद विक्रमभाऊ पाटील हे रस्त्यांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध केल्याचे सांगतात. याच निधीतून प्रभाग पाचमधील पंधरा वर्षांपासून रखडलेले गल्ली-बोळातील रस्ते आता चकाचक होऊ लागले आहेत. याच प्रभागात कोमल बनसोडे नगरसेविका आहेत, तर राष्ट्रवादीचे सचिन कोळी आणि रंजना तेवरे हे, जयंत पाटील यांच्या माध्यमातून आपण रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करणार असल्याचे सांगतात. एकंदरीत सत्ताधारी विकास आघाडी असो किंवा विरोधी राष्ट्रवादी असो, रखडलेल्या रस्त्यांसाठी प्रभाग पाच व सहासाठी वेगवेगळा न्याय का? असा सवाल नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.
कोट
पक्षप्रतोद या नात्याने प्रभाग सहामधील रस्ते, गटारी करण्याची जबाबदारी सत्ताधारी विकास आघाडीची आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फंडातून या प्रभागासाठी ९० लाख रुपयांची तरतूद केली आहे. शिराळा नाका ते कब्रस्तान यासाठी ५० लाख व अंतर्गत रस्त्यांसाठी ४० लाखांची रस्त्यांची कामे त्वरित सुरू होतील.
- विक्रमभाऊ पाटील, पक्षप्रतोद, विकास आघाडी