आटपाडी : आटपाडी तालुक्यात पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. शेंडगेवाडी, बनपुरी, तडवळे, भिंगेवाडी आणि मुळेवाडी परिसरात बुधवारी सायंकाळी गारपिटीमुळे डाळिंबासह भाजीपाल्याचे ५० लाखाहून अधिक रुपयांचे नुकसान झाले. प्रशासनाने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी आहे.
बुधवारी सायंकाळी तालुक्यात काही भागांला गारपिटीने झोडपून काढले. सलग वीस मिनिटे गारा कोसळत होत्या. शेंडगेवाडी, भिंगेवाडी आणि तडवळे भागात प्रचंड गारांची वृष्टी झाली. तडवळे, बनपुरी, नांगरेमळा आणि मुळेवाडी भागाचे काही प्रमाणात गारा कोसळला. रस्ते आणि शेत शिवार गाराने पांढरे-शुभ्र झाली होती. शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.
डाळिंब पिकाचे पूर्ण नुकसान झाले आहे. उन्हाळी हंगाम धरलेल्या डाळिंबाच्या कळ्यांवर गारांचा मार लागल्याने कळ्या आणि फळे फुटली आहेत. तसेच काळे डाग पडले आहेत. झाडांचीही पडझड होऊ मोठे नुकसान झाले आहे. शेवगा पिकाला फटका बसला आहे.
झाडांची शेंगा, पाने आणि फुले जमिनीवर पडली आहेत. इतर भाजीपाला पिकाचेही मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी केली जात आहे.
चौकट
कृषी विभागात कोरोना
आटपाडी येथील कृषी विभागाच्या कार्यालयातील तब्बल १२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामध्ये तालुका कृषी अधिकारी पोपटराव पाटील यांचाही समावेश आहे. त्यामुळे सध्या कार्यालय ओस पडले आहे. अशा परिस्थितीतही डाळिंब १२ हेक्टर, शेवगा १२ हेक्टर, टोमॅटो ५० गुंठे, मिरची ५० गुंठे एवढे या गारपिटीत शेतीचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.
कोट
बुधवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसामुळे बनपुरी, आटपाडी परिसरातील २५ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याची नजरअंदाजाप्रमाणे माहिती आहे.
- सचिन मुळीक, तहसीलदार, आटपाडी