दत्ता पाटील तासगाव : परतीच्या पावसाने तासगाव तालुक्यातील बहुतांश शेतकरी देशोधडीला लागला आहे. प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचण्यासाठी कसरत सुरू आहे. मात्र पंचनाम्याचे निकष पूर्ण करताना दिवसभरात जेमतेम पन्नासभर शेतकऱ्यांचे पंचनामे होत आहेत. त्यामुळे मुदतीची डेडलाईन पूर्ण कशी होणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दुसरीकडे लवकर पंचनामे न झाल्याने नुकसान झालेले खरिपाचे पीक शेतात तसेच पडून द्यायचे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे खरीप हातचा गेला, तरी रब्बीसाठी तयारी करताना पंचनाम्याचे घोंगडे अडकल्याचे चित्र आहे.तासगाव तालुक्यात एकूण ४३ हजार २७७ हेक्टर इतके पेरणी क्षेत्र आहे. त्यापैकी प्रशासनाच्या नजरअंदाजानुसार ३४ हजार १०४ हेक्टरचे नुकसान झाले आहे. परतीच्या पावसाने तालुक्याला झोडपून काढल्याने तालुक्यातील प्रमुख फळपीक असणाऱ्या द्राक्षबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सप्टेंबर महिन्यात पीक छाटणी घेतलेल्या सर्व द्राक्षबागांना कोट्यवधी रुपयांच्या नुकसानीला सामोरे जावे लागले.
खरिपाचीही सर्व पिके वाया गेली. ऐन खरीप काढणीच्या हंगामातच पावसाने सुरुवात केल्याने, बहुतांश पिके वाया गेली. ज्वारीपासून ते भुईमुगापर्यंत सर्वच पिकांना फटका बसला. शेतकऱ्यांच्या नुकसानीची दखल घेत, प्रशासनाकडून तातडीने पंचनाम्याला सुरुवात करण्यात आली. तलाठी, कृषी सहायक आणि ग्रामसेवक या तिघांची समिती नेमण्यात आली.
या समितीकडून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. मात्र हे पंचनामे करतानाही मोठी कसरत करावी लागत आहे. शेतात चिखल असल्याने वाहने रस्त्यावर लावून अर्धा, एक किलोमीटर चालत जावे लागते. त्याठिकाणी शेतमालक, पंच घेऊन जिओ टॅगिंगद्वारे फोटो काढून पंचनाम्याची कार्यवाही पूर्ण केली जाते.नियमानुसार पंचनामे करताना दिवसभरात केवळ ५० ते ६० शेतकऱ्यांचेच पंचनामे होत आहेत. प्रशासन बांधावर पोहोचून पंचनामे करत असताना, पंचनाम्याची वेळखाऊ पध्दत आणि भौगोलिक परिस्थिती यामुळे प्रशासनाने ठरवून दिलेल्या ७ तारखेच्या डेडलाईनपर्यंत पंचनामे पूर्ण होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. शासनाने पंचनामे करण्याची मुदत वाढवून शंभर टक्के पंचनामे करून घ्यावेत, अशी मागणी होत आहे.दुसरीकडे खरिपाचे पीक पूर्णपणे वाया गेल्यानंतर, शेतकरी रब्बीच्या पिकाची आस लावून बसला आहे. शेतातील ज्वारी पूर्ण काळी पडली आहे. अनेक ठिकाणी शेतातच उगवण झाली आहे. भुईमुगासह सर्वच खरिपाच्या पिकांची हीच अवस्था आहे. त्यामुळे नुकसान झालेले पीक किती दिवस शेतात ठेवायचे, असा प्रश्न शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे.
जिओ टॅगिंंगमुळे शेतात पीकच नसेल, तर नुकसान भरपाई कशी मिळणार आणि पीक काढले नाही, तर रब्बी पेऱ्याची तयारी कशी करणार? या कात्रीत शेतकरी सापडला आहे. त्यामुळे जाचक अटी न लावता तातडीने पंचनामे पूर्ण करावेत, अशी मागणी होत आहे.