पलूस : येथे एका दुकानात चोरी व साहित्याचे नुकसान केल्याप्रकरणी न्यायालयाने एकास दोषी ठरविले. तीन वर्षांचा सश्रम कारावास व चार हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास एक महिना साध्या कैदेची शिक्षा सुनावली आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, रोहित अशोक कांबळे (वय ३२, रा. पलूस, सध्या रा. इस्लामपूर ता. वाळवा) हा २०१३ मध्ये पलूसमध्ये विजय रामचंद्र नलवडे यांच्या कपड्याच्या दुकानात कामाला होता. त्यावेळी रोहितच्या हातातून नलवडे यांच्या मुलाच्या अंगावर रंग सांडला. नलवडे यांनी रोहित याला त्याचा जाब विचारला. त्याचा राग मनात धरुन रोहितने काम सोडले. त्यानंतर महिन्याभराने पुन्हा पलूसमध्ये आला. नलवडे यांच्या कापड दुकानाच्या बाजूलाच त्यांचे रंगाचेही दुकान आहे. त्याच्या छताचा पत्रा उचकटून रोहितने आत प्रवेश केला. तेथील साहित्याची मोडतोड केली. तेथील वेगवेगळे रंग घेतले. ते कापड दुकानात नेऊन नव्याकोऱ्या कपड्यांवर टाकले. यामध्ये नलवडे यांचे ५ लाख रुपयाचे नुकसान झाले. जाताना रोहितने १७ हजार रुपयांची रोकडही चोरली.याबाबत नलवडे यांनी पलूस पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांनी तपासाअंती पलूस न्यायालयात खटला दाखल केला. त्याचा निकाल सोमवारी लागला. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आय. ए. वाय. ए. खान यांनी आरोपी रोहित याला शिक्षा सुनावली. सहायक पोलिस निरिक्षक प्रवीण साळुंखे, न्यायालयातील अंमलदार मनीषा पाटील व डी. एम. बुधावले यांनी तपास केला.
Sangli: रागातून ऑईलपेंट टाकून दुकानातील पाच लाखांचे कपडे खराब केले, पलूसच्या एकाला कारावास
By संतोष भिसे | Published: January 30, 2024 4:24 PM