घाटनांद्रे : कवठेमहांकाळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी नगदी पीक म्हणून द्राक्ष लागवडीला पसंती दिल्यानंतर तालुक्यात हळूहळू द्राक्ष बागायत क्षेत्र वाढले. हळूहळू शेतकरी निर्यातक्षम द्राक्षेही पिकवू लागला. त्याला युरोपात तसेच आखाती देशातही चांगला भाव मिळून मागणी वाढू लागली. त्यामुळे तालुक्यात द्राक्ष क्षेत्रही वाढले. पण गेल्या काही वर्षांपासून सतत कमी पडणाऱ्या पावसामुळे व हवामानाच्या लहरीपणामुळे या द्राक्ष बागायत क्षेत्राला फटका बसत आहे.बागायत क्षेत्रही घटण्यास सुरुवात झाली आहे. सततच्या दुष्काळ व सध्या पाणी टंचाईमुळे द्राक्षबागा करपू लागल्या आहेत. त्यातच हवामानाच्या हलरीपणाचा फटकाही द्राक्षबागेला बसत आहे. रोगांचे अतिक्रमण हटविण्यासाठी महागडी औषधे वापरावी लागत असून, शेतकऱ्यांना हवामानाचा वेध घेत औषधे सोबत घेऊन बागेत थांबावे लागत आहे. दुष्काळामुळे टॅँकरने पाणी देऊन बागा जगविल्या जात आहेत. तसेच भरमसाठ रोजंदारी देऊन कामगार बागेत कामाला आणावे लागतात. १२ महिने २४ तास राबूनही द्राक्षाचे दर हे परप्रांतीय दलाल ठरवित असून, ते द्राक्षाला गोडीच नाही, रंग आला नाही, अशी विविध कारणे सांगून ते दर पाडत असतात. त्यामुळे महागडी बियाणे, खते, औषधे, टॅँकरने घातलेल्या पाण्याचा खर्च तसेच रोजंदारीवर होणारा खर्च यातून १०० टक्के नफा मिळेलच असे नाही. खर्च जाता पदरात काही पडेल, याची खात्रीही नाही.कमी पावसाने कूपनलिका, विहिरींनीही तळ गाठला आहे. द्राक्षबागा जतन करण्यासाठी टॅँकरने पाणी आणावे लागत असून, काही शेतकरी आर्थिक भुर्दंड सोसून दुसऱ्या ठिकाणी कूपनलिका खोदत आहेत. सगळीकडे कूपनलिका यंत्रांची घरघर ऐकू येत आहे. कूपनलिका खोदण्यासाठी पंधरा-पंधरा दिवस थांबावे लागत आहे. परंतु ज्या बळिराजाची आर्थिक स्थिती नाजूक आहे, अशांवर बागा सोडून देण्याची वेळ प्रशासनाने आणली आहे. (वार्ताहर) योजना : कागदावरतालुक्यातील काही भागात जलसिंचनाचे काम झाले आहे. सध्या म्हैसाळ योजनेत आवर्तनही चालू आहे. त्याचा काही भागाला लाभ होईल, परंतु तालुक्यातील बराच भाग अद्यापही सिंचन योजनेपासून वंचित आहे. तेथे ना म्हैसाळ योजना, ना टेंभू योजना. तेथील योजना या फक्त कागदावरच आहेत.
द्राक्षबागा धोक्यात...
By admin | Published: May 30, 2016 11:27 PM