फोटो ओळ - सोनी येथे पाइप बंद केल्याने द्राक्षबागेत पाणी साचून राहिले आहे.
सांगली : मिरज तालुक्यातील सोनी येथील धुळगाव-उपळावी रस्त्यावर असलेला नैसर्गिक नाल्याला मिळणाऱ्या पाइप हेतुपुरस्कृत सिमेंट काँक्रीट टाकून बंद केल्या आहेत. त्यामुळे वीस एकर द्राक्षबाग व इतर कोरडवाहू शेती त्याचप्रमाणे रस्त्याला धोका निर्माण झाला आहे. गेल्या आठवड्यात सतत पडलेल्या पावसामुळे द्राक्षबागेत तीन फुटांहून जास्त पाणी साचून राहिले आहे. द्राक्षबागेचे पीक धोक्यात आले आहे.
सोनी येथील काही शेतकऱ्यांच्या द्राक्षबागा या धुळगाव-उपळावी या रस्त्यालगत आहेत. रस्त्याच्या वरच्या बाजूस सोनी येथील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी आहेत, तर खालच्या बाजूला धुळगाव (ता. तासगाव) येथील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी आहेत.
रस्त्याची उंची खालच्या बाजूपेक्षा जवळपास सात-आठ फूटवर आहे. त्यामुळे सोनी येथील शेतकऱ्यांच्या शेतातील पाणी हे पूर्वी असलेल्या नैसर्गिक नाल्यातून ओढ्याला जाऊन मिळत होते, पण हा नैसर्गिक नाल्यात जाणारे पाणी बंद केल्याने वरच्या बाजूस असलेल्या द्राक्षबागेमध्ये पावसाचे पाणी साचून राहिले आहे, असे कृत्य करणाऱ्या शेतकऱ्यावर कारवाई करावी तसेच साचून राहत असलेले पावसाचे पाणी नाल्यात सोडण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केले आहे.