किरण सावंत ल्ल पलूसपलूस तालुक्यात काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीमुळे प्रथमच भाजपचे कमळ फुलले. जिल्हा परिषदेच्या तीन, तर पंचायत समितीच्या चार जागा मिळवत माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी प्रथमच तालुक्यात एकहाती सत्ता मिळवली. पलूस तालुक्याचे भाग्यविधाते म्हणून ओळखले जाणारे डॉ. पतंगराव कदम व कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मात्र आत्मपरीक्षण करायला लावणारा हा निकाल आहे. भाजपला मिळालेल्या यशाने जिल्हाध्यक्ष देशमुख यांची ताकद वाढली आहे. अनेक वर्षे डॉ. पतंगराव कदम आणि पृथ्वीराज देशमुख हे पारंपरिक विरोधक, मात्र राजकारणात कदम यांच्या नेतृत्वाला देशमुख धक्का देऊ शकले नाहीत. सलग २० वर्षे मंत्री असताना डॉ. कदम यांच्याकडे कार्यकर्त्यांची मोठी कुमक मतदार संघात काम करत होती. सत्ता असताना तालुक्यात काहीही कमी पडू दिले नाही. हे सर्व करत असताना देशमुख यांनी प्रत्यक्ष निवडणुकीत झुंज दिली. देशमुख यांनी भाजपत प्रवेश करुन जिल्हाध्यक्ष पदही मिळवले. त्यांच्या नेतृत्वाखाली पलूस-कडेगाव तालुक्यात भाजप-राष्ट्रवादी युती झाली. त्याच जोरावर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या मैदानात उतरुन कॉँग्रेसच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावत तालुक्यातील कुंडल जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादीने, तर दुधोंडी अंकलखोप, भिलवडी जिल्हा परिषद गटात भाजपने बाजी मारली. तसेच त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समिती गणातही भाजप-राष्ट्रवादीने एकहाती सत्ता मिळवली. अंकलखोप गटातील आमणापूर व भिलवडी गटातील वसगडे या पंचायत समितीच्या दोनच जागांवर कॉँग्रेसला समाधान मानावे लागले. पलूस तालुक्यात कार्यकर्त्यांची भली मोठी फौज एकसंध ठेवण्यात नेत्यांना अपयश आले. कॉँग्रेसच्या तिकीट वाटपावरुन काही कार्यकर्ते नाराज होते. मात्र नेत्यांच्या मर्जीतील उमेदवारांना तिकीट मिळाले. याउलट भाजपने तगडे उमेदवार मैदानात उतरविले. कॉँग्रेस नेत्यांनी गावोगावी कार्यकर्त्यांवर भिस्त ठेवली; पण काही कार्यकर्ते मतदारांकडे फिरकलेच नाहीत. त्यातच गावो-गावी असणाऱ्या गटबाजीमुळे कॉँग्रेसला मोठा दणका बसला आहे. एकूणच, हा निकाल काँग्रेसला आत्मपरीक्षण करायला लावणारा ठरला आहे.
गटबाजीमुळे बालेकिल्ल्यात कॉँग्रेसचा दारुण पराभव
By admin | Published: February 28, 2017 11:48 PM