मिरज : मिरजेतून लातूरला पाणी पुरवठ्यासाठी रेल्वे स्थानकातील हैदरखान विहिरीने महत्त्वाची भूमिका बजावली असताना, मीरासाहेब दर्ग्यातील ऐतिहासिक नकट्या विहिरीचे अस्तित्व नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. शहरातील ऐतिहासिक व मोठ्या विहिरींची दुरवस्था दूर करण्याची मागणी होत आहे. मीरासाहेब दर्ग्यातील आदिलशाहीच्या काळात पंधराव्या शतकात दर्ग्यात पाणी वापरासाठी खोदण्यात आलेली विहीर ‘नकट्याची विहीर’ या नावाने ओळखली जाते. या पाचशे वर्षे जुन्या ऐतिहासिक विहिरीत गेल्या २० वर्षांपासून कचरा टाकण्यात येत आहे. दर्गा आवारातील या विहिरीचा आकार मोठा असून, शंभर फूट खोल विहिरीत कमानींचे दगडी बांधकाम आहे. १९९६ पर्यंत विहिरीतील पाण्याचा वापर सुरू होता, मात्र त्यानंतर पाण्याचा वापर नसल्याने विहिरीत कचरा टाकला जात आहे. कचरा टाकण्यासाठी वापर करण्यात येत असल्याने या ऐतिहासिक विहिरीचे अस्तित्व नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. विहिरीतील कमानींची पडझड झाली आहे. या विहिरीतील पाण्याचे मोठे झरे कचरा व मातीमुळे बंद झाले आहेत. काही वर्षांपूर्वी या विहिरीतील गाळ काढण्याचा प्रयत्न केला होता; मात्र पाण्याचे मोठे झरे लागल्याने गाळ काढणे शक्य झाले नाही. (वार्ताहर)मोठ्या प्रमाणावर पाणीसाठ्याची क्षमताया मोठ्या विहिरीचे पुनरुज्जीवन केल्यास मोठ्याप्रमाणात पाणीसाठा उपलब्ध होणार आहे. यावर्षीचा दुष्काळ व पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर विहिरी, बंधारे व पाणीसाठ्याचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. लातूरला पाणी पुरवठ्यासाठी रेल्वेच्या हैदरखान विहिरीची साफसफाई व स्वच्छता करून त्यात पाणीसाठा करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मीरासाहेब दर्गा आवारातील ऐतिहासिक नकट्या विहिरीतील गाळ काढून विहिरीच्या पुनरुज्जीवनाची मागणी होत आहे. मिरजेतील मीरासाहेब दर्ग्यातील ऐतिहासिक नकट्या विहिरीची दुर्लक्षामुळे पडझड झाली आहे. या विहिरीत आता परिसरातील कचराही टाकला जात आहे.
नकट्या विहिरीचे अस्तित्व धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2016 11:49 PM