लोकमत न्यूज नेटवर्क
कोकरुड : सय्यदवाडी (येळापूर, ता. शिराळा) येथे चांदोली अभयारण्यातून चारा आणि पाण्याच्या शोधात आलेल्या गव्याचे गुरुवारी दर्शन झाले. हा गवा भरवस्तीतून निनाई मंदिराच्या पठाराच्या बाजूस असलेल्या डोंगरात गायब झाला. गव्याच्या दर्शनाने ग्रामस्थांत भीतीचे वातावरण पसरले आहे. कराड-शेडगेवाडी राज्य मार्गाच्या गवळेवाडीकडील बाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात ऊस, शाळू, हायब्रीड, आदी पिके शेतात उभी आहेत. अत्यंत दाटीवाटीच्या या पिकांतून गुरुवारी एक भला मोठा प्राणी घराच्या बाजूने येत असल्याचे संचित जयवंत दिंडे या लहान मुलाने पाहिले. त्याला पाहून तो ओरडतच घरात गेला. त्यानंतर आजूबाजूचे लोक जमा होऊन घराच्या मागील बाजूला आले. त्यांना गवा रेडा डोंगराच्या बाजूने जात असल्याचे दिसले. ही वार्ता वाडीत पसरल्याने शेकडो लोक दिंडे यांच्या घराकडे धावले. लोकांचा कलकलाट आणि हातवारे करण्याने गवा वाघबिळाच्या बाजूने पळत सुटला. वाघबिळाशेजारी असणाऱ्या तलावात जाऊन पाणी पिऊन तो डोंगरदरीतील झाडाझुडपातून डोंगरपठारावर असणाऱ्या निनाई मंदिराच्या बाजूने पळत सुटला.
त्यातच गुरुवारी सय्यदवाडी येथील लोकांचा आठवडी सुट्टीचा दिवस असल्याने आणि वाडीच्या बाहेर रक्षाविसर्जन कार्यक्रम असल्याने महिला, पुरुष, नातेवाईक यांसह शेकडो लोकांना गव्याचे जवळून दर्शन झाले. येळापूरसह मेणी परिसरात एकापेक्षा अधिक गवे असण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.