अंकलखोप : ‘दिगंबरा दिगंबरा... श्रीपाद वल्लभ दिगंबरा’च्या गजरामध्ये श्री क्षेत्र औदुंबर येथे सायंकाळी साडेपाच वाजता दत्त जन्मकाळ संपन्न झाला. यावेळी मंदिर परिसरामध्ये भाविकांची अलोट गर्दी उसळली. दत्त जयंतीनिमित्ताने महाराष्ट्रभरातून अनेक भाविक श्री क्षेत्र औदुंबर येेथे दाखल झाले होते. पहाटे पाच वाजल्यापासून दत्त मंदिरामध्ये गर्दी झाली होती. श्री दत्त जन्मकाळाच्या वेळी मंदिर परिसर फुलांनी बहरून गेला.आज दिवसभरामध्ये भाविकांची संख्या मोठी होती. भाविकांनी श्री दत्तगुरूंच्या विमल पादुकांचे दर्शन घेतले. रात्री ११ वाजेपर्यंत भाविकांची गर्दी होती. औदुुंबरमध्ये येणारे चारीही रस्ते गर्दीने वाहून गेले होते. औदुंबर फाटा या ठिकाणी व औदुंबरला येणारे दोन्ही रस्ते वाहतुकीसाठी बंद केल्याने औदुंबरमध्ये वाहनांची गर्दी झाली नाही. तसेच रस्ता रुंदीकरण झाल्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली नाही. या मार्गावरील ऊस वाहतूक रात्री १२ पर्यंत बंद केली होती. श्री दत्त सेवाभावी मंडळाच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांना ने-आण करण्यासाठी मोफत रिक्षाची सोय केली होती.पहाटे काकड आरती, मंगल आरती. महापूजा, नैवेद्य, महाआरती, दुपारी महाआरतीनंतर श्री दत्त सेवाभावी मंडळाच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन केले होते. दत्त दर्शनासाठी देवस्थान समितीच्या वतीने दर्शन रांगा करण्यात आल्या होत्या.अंकलखोप ग्रामपंचायतीच्या वतीने पाण्याची व्यवस्था चोखपणे करण्यात आली होती. आरोग्याची व औषधाची व्यवस्था जि. प. च्या आरोग्य विभागाने केली होती. अंकलखोपच्या सरपंच राजेश्वरी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली उपसरपंच संगीता कोळी, देवस्थानचे अध्यक्ष दीपक सूर्यवंशी, उपाध्यक्ष अमर पाटील, सचिव धनंजय सूर्यवंशीसह सर्व पदाधिकारी यांनी नियोजन केले. भिलवडी पोलिस ठाण्याचे निरीक्षक नितीन सावंतसह सात पोलिस अधिकाऱ्यांसह ११८ पोलिस कर्मचारी होते. पोलिस चौकी कर्मचारी यांनी यात्रेत चोख बंदोबस्त ठेवला होता.
Sangli: औदुंबरला जयंतीनिमित्त दत्तगुरुंचा जयघोष, भाविकांची अलोट गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2023 1:31 PM