सांगली- सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील देवराष्टे येथील दत्तात्रय लोहार यांनी एक भन्नाट चार चाकी बनवली आहे. भंगार आणि दुचाकीच्या भागांपासून बनवलेल्या या कारच्या प्रयोगाचे 'दैनिक लोकमत'मध्ये वृत्त प्रकाशित केले होते. तसेच या कारच्या व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकुळ घातला. यानंतर काही दिवसांपूर्वी लोहार यांनी बनवलेल्या या कारची दखल चक्क महिंद्रा समुहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी घेतली. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून लोहार यांच्या वाहनाचा व्हिडिओ शेअर केला असून त्यांना बोलेरो कारची ऑफर देखील दिली आहे.
बीबीसी मराठी या वृत्तावाहिनीने दत्तात्रय यांना आनंद महिंद्रांच्या बोलेरोच्या ऑफरविषयी विचारलं. पण महिंद्रा यांची ऑफर स्वीकारायची की नाही या संभ्रमात दत्तात्रय आणि त्यांचं कुटुंब असल्याचं त्यांनी सांगितलं. दत्तात्रय म्हणतात, त्यांना माझी गाडी आवडली याचा मला आनंद आहे. पण ती नवी गाडी वापरण्याची माझी परिस्थिती नाही. कारण त्यासाठीचा कर, इंधन भरण्याची माझी ऐपत नाही, असं दत्तात्रय यांनी सांगितलं.
दत्तात्रय यांच्या पत्नीने देखील महिंद्रा यांनी दिलेल्या ऑफरबाबत आपलं मत व्यक्त केलं आहे. ही आमच्या घरातली पहिली लक्ष्मी असल्याने ती द्यावीशी वाटत नाही. ती आल्यापासून आमचं आयुष्य नीट सुरू आहे. हवंतर त्यांच्यासाठी आम्ही दुसरी बनवून देऊ. तरीही त्यांनी नवी गाडी खुशीने दिली तर देऊ. पण या गाडीच्या बदल्यात नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता आनंद्र महिंद्रा यावर काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आनंद महिंद्रा नक्की काय म्हणाले?-
आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर या गाडीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करत खुद्द आनंद महिंद्रा यांनी त्या व्यक्तीचे कौतुक केले आहे. तसेच, या व्यक्तीला नवीन बोलेरो देणार असल्याचे म्हटले. व्हिडिओसोबत कॅप्शनमध्ये आनंद महिंद्रा यांनी लिहीले की, 'हे कोणत्याही नियमाशी जुळत नाही, पण, मी आमच्या लोकांच्या कल्पकतेचे आणि क्षमतेचे कौतुक करणे कधीही थांबवणार नाही. ती गाडी चालवून व्यक्तीने नियमांचे उल्लंघन केले आहे, त्यामुळे कधी ना कधी स्थानिक अधिकारी त्या व्यक्तीला ते वाहन चालवण्यापासून रोखतील. पण, या वाहनाच्या बदल्यात मी त्याला वैयक्तिकरित्या बोलेरो गाडी देईन. त्याची ही गाडी इतरांना प्रेरणा देण्यासाठी MahindraResearchValley मध्ये प्रदर्शनासाठी ठेवली जाऊ शकते, असं आनंद महिंद्रा यांनी म्हटलं आहे.
भंगारातून तयार केली चारचाकी-
अवघ्या दोन महिन्यात तयार झालेल्या या गाडीला त्याने 'जुगाड जिप्सी' असे नाव दिले आहे. कडेगाव तालुक्यातील देवराष्ट्रे गावात राहणाऱ्या दत्तात्रय लोहार यांनी ही जुगाड जिप्सी तयार केली आहे. ही चारचाकी गाडी बनवण्यासाठी त्यांना अवघा 50 ते 60 हजारांचा खर्च आला. विशेष म्हणजे, जीप गाडीची प्रतिकृती असलेली ही जुगाड जिप्सी मोटारसायकप्रमाणे किक मारुन स्टार्ट होते.
दुचाकी आणि चारचाकीचे मिश्रण-
दत्तात्रय लोहार यांचे देवराष्ट्रे या गावात फॅब्रिकेशनचे एक छोटेशे वर्कशॉप आहे. अनेकांना घरात चारचाकी गाडी असावी वाटते, दत्तात्रय यांनाही घराच चारचाकी असावी, अशी इच्छा होती. पण, आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे त्यांना नवीन गाडी घेणे परवडणारे नव्हते. पण, घरापुढे चारचाकी उभी रहावी, या जिद्दीने पेटलेल्या दत्तात्रय यांनी घरातील भंगार दुचाकीचे इंजिन, जीवचे बोनेट आणि रिक्षाची चाके वापरुन ही जुगाड जिप्सी तयार केली आहे.