जत (जि. सांगली) : अन्नपूर्णा ईश्वर आवटी. उमराणी (ता. जत) येथील ऊसतोडणी मजुराची मुलगी. कठिण परिस्थितीतून शिक्षण घेताना वकील होण्याचे स्वप्न बाळगले. कठोर परिश्रम व चिकाटीने त्याही पुढे जात आज ती न्यायाधीश बनली आहे.घरची परिस्थिती हलाखीची असल्याने वडील मजुरीसाठी चिप्री (ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) येथे गेले. त्यांच्याबरोबर कुटुंबही स्थलांतरित झाले. त्यामुळे अन्नपूर्णाचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण चिप्री येथेच झाले. आई-वडिलांची तसेच उमराणी गावातील बोलीभाषा कन्नड असली तरी, अन्नपूर्णा मराठीत शिकली. आई-वडिलांनी मोलमजुरी करून तिला शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन दिले. तिने दिवस-रात्र मेहनत घेतली. सतत निर्माण होणा-या अडचणींना धैर्याने तोंड देत कायद्याची पदवी मिळवली. वकील झाल्यानंतर प्रशिक्षणासाठी कोल्हापूर न गाठता तिने तालुक्याला प्राधान्य दिले. प्रॅक्टीस करीत असताना लोकसेवा आयोगामार्फत परीक्षा देऊन ती न्यायाधीश बनली. परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी वर्षभर ती पुण्यात राहिली होती.
सांगतील ऊसतोड मजुराची मुलगी बनली न्यायाधीश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 5:57 AM