सांगली : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्यावतीने मार्च २०१६ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी आॅनलाईन जाहीर झाला. जिल्ह्याचा निकाल ९२.९६ टक्के लागला. त्यात मागील वर्षीप्रमाणे यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. उत्तीर्ण होण्याची मुलांची टक्केवारी ९१.८० टक्के, तर मुलींची ९४.४० टक्के इतकी असून निकालाच्याबाबतीत कोल्हापूर विभागात सांगली तिसऱ्या क्रमांकावर आहे. दरम्यान, जिल्ह्यातील १३३ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला असून गेल्यावर्षीपेक्षा जिल्ह्याच्या निकालात घट झाली आहे. दहावीच्या निकालाच्या तारखेबाबत अनेक तर्कवितर्क सोशल मीडियावर लढवले जात होते. अखेर मंडळाने सोमवारी निकाल जाहीर होणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार आॅनलाईन निकाल जाहीर करण्यात आला. नेटवर दुपारी एक वाजता निकाल जाहीर होणार असल्याने, मुलांसह पालकांनी नेट कॅफेमध्ये गर्दी केली होती. निकाल जाहीर झाल्यानंतर पहिली दहा मिनिटे सर्व यंत्रणा धिम्या गतीने चालल्याने, निकाल समजण्यास उशीर लागत होता. त्यानंतर मात्र संकेतस्थळावर त्वरित निकाल मिळत होता. जिल्ह्यातील ४३ हजार १९ विद्यार्थ्यांनी दहावी परीक्षेसाठी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ४२ हजार ९१७ विद्यार्थी परीक्षेस बसले होते, त्यातील ३९ हजार ८९७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ११ हजार ६०३ विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य श्रेणी प्राप्त केली. तसेच १५ हजार ३४ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ११ हजार १७४ द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. पुनर्परीक्षार्थींचा निकाल ३३.०२ टक्के लागला आहे. १ हजार ४९० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी ४९२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.मागीलवर्षी जिल्ह्याचा निकाल ९४.४३ टक्के लागला होता. त्यात मुलींचीच सरशी झाली होती. विद्यार्थिनींचा निकाल ९५.९० टक्के, तर मुलांचा ९३.४४ टक्के लागला होता. यंदा देखील मुलींनीच बाजी मारल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात सर्वाधिक कडेगाव तालुक्यातील तब्बल ९६.८१ टक्के विद्यार्थिनी दहावीत उत्तीर्ण झाल्या आहेत. त्यानंतर वाळवा (९५.६९), शिराळा (९५.४४) आणि आटपाडी (९५.४२) या तालुक्यांचा समावेश आहे. सांगली शहरातून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थिनींचे प्रमाण ९३.७४ टक्के आहे. जिल्ह्यातील १३३ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. विद्यार्थ्यांना निकालाची मूळ प्रत दि. १५ जून रोजी वितरित करण्यात येणार आहे. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची १८ जुलैपासून पुनर्परीक्षा होेणार आहे. (प्रतिनिधी)सावित्रीच्या लेकी लय भारीगेल्या काही वर्षांपासून निकालात मुलांपेक्षा मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण अधिक आहे. हा पायंडा यंदाही कायम राहिला असून, ९४.४० टक्के इतकी मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी आहे, तर मुलांची टक्केवारी ९१.८० टक्के इतकी आहे. शंभर नंबरी शाळासोमवारी जाहीर झालेल्या दहावीच्या निकालात जिल्ह्यातील १३३ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. यात सर्वाधिक १९ शाळा सांगली शहरातील आहेत. शंभर टक्के निकाल लागलेल्या शाळाची तालुकानिहाय संख्या अशी : वाळवा १९, शिराळा १२, तासगाव ५, सांगली १९, मिरज १४, पलूस १०, खानापूर १६, कडेगाव ८, कवठेमहांकाळ ५, जत १५, आटपाडी १० अशा जिल्ह्यातील १३३ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.
सांगलीत मुलीच ठरल्या सरस
By admin | Published: June 06, 2016 11:39 PM