लोकमत न्यूज नेटवर्क कार्वे : (ता. वाळवा) येथील महेश विलास पाटील या युवकाने बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये शिक्षा होईल, या भीतीने बुधवारी सकाळी शेतातील झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, आत्महत्येस बलात्कारीत मुलीचे वडील व इतर नातेवाईक जबाबदार असल्याचा आरोप उपसरपंच केशव पाटील व ग्रामस्थांनी करून त्यांच्यावर गुन्हा नोंद झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा घेतला होता. परंतु पोलिसांनी संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यात आला. घटनास्थळ व कुरळप पोलिसांतून मिळालेली माहिती अशी की, येथील महेश पाटील हा बुधवारी सकाळी एकटाच शेतातील कामासाठी गेला होता. सकाळी दहाच्या दरम्यान त्याच्या घरातील सर्वजण शेतामध्ये कामासाठी आले होते. त्यावेळी त्याने तेथील आंब्याच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याचे आढळले. दरम्यान, महेशचे वडील विलास पाटील यांनी, महेशवर बलात्काराच्या गुन्ह्याची कोर्टात तारीख सुरू होती. त्यामध्ये शिक्षा होईल, या भीतीपोटी आत्महत्या केल्याची वर्दी कुरळप पोलिसांत दिली आहे. मात्र, याबाबत उपसरपंच केशव पाटील व डॉ. सीताराम पाटील यांनी अशी माहिती दिली की, महेश याचे गावातील एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. या प्रेमप्रकरणातून ही मुलगी महेश याच्याबरोबर पळून गेली होती. मुलीच्या कुटुंबियांनी अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेल्याची तक्रार पोलिसांत दिली. त्यानंतर महेश व मुलीस पोलिसांनी शोधून काढले होते व मुलगी अल्पवयीन असल्यामुळे महेशवर बलात्काराचा गुन्हा नोंद झाला होता. सध्या या गुन्ह्याची इस्लामपूर येथील कोर्टात सुनावणी सुरू आहे. गावामध्ये वादविवाद नको म्हणून उपसरपंच केशव पाटील व इतर ग्रामस्थांनी दोन्ही कुटुंबांत महेशच्या कुटुंबाकडे प्रकरण मिटविण्यासाठी नऊ लाख रुपयांची मागणी केली होती.परंतु पैशाची तजवीज होऊ न शकल्यामुळे कोणताही निर्णय झाला नाही. दोन दिवसांपासून कोर्टामध्ये सुनावणी सुरू असल्यामुळे महेश तणावाखाली होता व त्यामुळेच त्याने आत्महत्या केली. दरम्यान, उपसरपंच केशव पाटील व ग्रामस्थांनी पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतली व संबंधितांवर गुन्हा नोंद केल्याशिवाय महेशचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा घेतला, परंतु पोलिसांनी संबंधितांवर गुन्हा नोंद करण्याचे आश्वासन दिल्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यात आला. अत्यंत शोकाकुल वातावरणात कार्वे येथे मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. महेश याच्या पश्चात आई, वडील, बहीण व भाऊ असा परिवार आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कुरळप पोलिसांनी खबरदारी घेतली होती.
शिक्षेच्या भीतीने युवकाची आत्महत्या
By admin | Published: June 22, 2017 1:01 AM